दैनिक स्थैर्य । दि. १० डिसेंबर २०२२ । फलटण । महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त, फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, कृषी महाविद्यालय, फलटणच्या विद्यार्थिनींनी सासकल, ता. फलटण येथे मृदा दिनानिमित्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना माती परीक्षण, प्रक्रिया व माती परीक्षणाची आवश्यकता समजावून दिली.
कृषी महाविद्यालय, फलटणच्या विद्यार्थिनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सासकल येथे आगामी ५ आठवडे वास्तव्यास राहणार असून तेथील शेतकऱ्यांना शेतीची सुधारित औजारे, नवीन तंत्रज्ञान, सुधारित बी बियाणे, बीज – प्रक्रिया, खताची मात्रा किती व कधी द्यावी तसेच दुग्धोत्पादन, जनावरांचे आजार,त्याबाबत घ्यावयाची दक्षता याविषयी माहिती देवून मार्गदर्शन करणार आहेत.
मृदा दिनाचे औचित्य साधून माती परीक्षण काळाची गरज या विषयावर कृषी महाविद्यालय, फलटण येथील माती व पाणी तपासणी तज्ञ डॉ. प्राजक्ता मेटकरी खरात यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. मातीप्रमाणेच पाणी परीक्षण हे किती महत्त्वाचे आहे याचे योग्य मार्गदर्शन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.
माती व पाणी परीक्षण अहवाल आल्यानंतर ज्या जमिनीतील माती व पाणी परीक्षण केले त्या क्षेत्रातील क्षार अथवा जीवनसत्त्वाचे प्रमाण लक्षात आल्यानंतर त्या क्षेत्रात घ्यावयाच्या पिकांसाठी आवश्यक असणारी जीवनसत्त्व पुरेशा प्रमाणात नसतील तर ती खतांद्वारे किती व कशी द्यावीत याविषयी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करून पिके जोमदार आणण्याचा मार्ग समजावून दिला. यावेळी सरपंच उषाताई फुले, कृषी सहाय्यक सचिन जाधव, सुनीता सावंत ( प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग), असिस्टंट मार्केटिंग मॅनेजर अजित जगताप, ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते. कृषी महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितिशा पंडित , प्रा. स्वप्निल लाळगे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या वैभवी ढमे, शिल्पा भिसे, दिप्ती भोईटे, मैथिली पोरे, गौरी रणदिवे, अस्मिता सावंत, आर्या शिंदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.