दैनिक स्थैर्य । दि. ०८ जानेवारी २०२३ । मुंबई । लोकशाहीचा ढाचा अबाधित राखण्यासाठी निवडणुका, मतदान, मतदार नोंदणी या अत्यावश्यक बाबी आहेत. निवडणुका निःपक्षपाती आणि पारदर्शक वातावरणात पार पाडणे ही निवडणूक कार्यालयाची जबाबदारी आहे. मात्र ही जबाबदारी पार पाडत असताना प्रसारमाध्यमांचे आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे निवडणूक आयोगाला सहकार्य लाभत असते. हे लक्षात घेऊन यंदापासून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पत्रकार आणि सामाजिक संस्थांना पुरस्कार जाहीर केले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका यासंबंधी माहितीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी ‘निवडणूक वार्तांकन पुरस्कार’ दिला जाणार आहे. तर मतदार जागृतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ‘मतदार-मित्र पुरस्कार’ दिला जाणार आहे. १० हजार रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. हे पुरस्कार २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात वितरित केले जातील.
पत्रकार आणि स्वयंसेवी संस्था या पुरस्कारासाठी स्वतः अर्ज करू शकतात. त्याकरता मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका यासंबंधी गेल्या वर्षभरातील आपल्या कार्याची अहवाल स्वरुप माहिती आणि छायाचित्रांसह आपला अर्ज [email protected] या ई मेल आयडीवर अर्ज पाठवावा.
अधिक माहितीसाठी संपर्क – प्रणव सलगरकर (मो.क्र. ८६६९०५८३२५)