स्थैर्य, कराड, दि. १९ : संपूर्ण जगात हाहाकार माजविणार्या करोना विषाणूने बाधित झालेल्या रुग्णांना सेवा देणार्या कराड व परिसरातील हॉस्पिटल समूह प्रमुख, डॉक्टर व स्टाफ यांना ‘डॉक्टर डे’ चे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ कराडच्यावतीने करोना योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आल्याची माहिती क्लबचे सचिव डॉ. शेखर कोगनूळकर यांनी दिली.
सध्या महामारी करोना विषाणूने थैमान घातले असून दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कराड तालुक्यातील तीनशेहून अधिक करोना बाधित रुग्णांना उपचार करून करोना मुक्त करण्यात यश आले आहे. करोना बाधित रुग्णांची सेवा व उपचार करणार्या हॉस्पिटल समूह प्रमुख, डॉक्टर व त्यांच्या हाताखाली काम करणारे सर्व स्टाफ व ग्रामीण भागातील कार्यरत असणारे ग्रामपातळीवरील आशासेविका ते डॉक्टर हे सर्वजण कोरोनाशी दोन हात करून बाधित रुग्णांना सेवा देत आहेत. या वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना योद्धांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कराडच्यावतीने ‘डॉक्टर डे’चे औचित्य साधून कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने कृष्णा रुग्णालयाचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले, सह्याद्री हॉस्पिटलचे प्रमुख व्यंकटेश मुळे, एरम हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सुभाषराव एरम, कराड हॉस्पिटलचे डॉ. गावकर, आयएमए हॉस्पिटलचे डॉ. वैभव चव्हाण, कराड नगरपालिका दवाखान्याचे डॉ. कुलकर्णी, मॅडम, पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत डांगे, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रकाश शिंदे, उंडाळे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. शेखर कोगनूळकर, पंचायत समितीच्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख तर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर व सर्व हॉस्पिटलचे कर्मचारी यांचा रोटरी क्लबचे अध्यक्ष गजानन माने व सचिव डॉ. शेखर कोगनूळकर हस्ते करण्यात सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ. सुरेश भोसले, डॉ. सुभाषराव एरम यांनी रोटरी क्लब ऑफ कराडच्या या उपक्रमाचे कौतुक करून पुढील काळात या क्लबला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली.