स्थैर्य, फलटण : करोना संसर्ग नियंत्रणासाठी प्रयत्नशील शासन/प्रशासन राबवीत असलेले विविध उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोकांना उद्युक्त करण्याबरोबर वृत्तपत्रांच्या माध्यमातून जन प्रबोधन करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता आणि धैर्य टाइम्सचे मुख्य संपादक सचिन मोरे यांना मानवाधिकार संरक्षण समिती, नवी दिल्लीच्या वतीने कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.
सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन समितीचे प. महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी जी. एम. भगत यांनी या दोघांना सन्मानित केले, त्यावेळी समितीचे फलटण शहराध्यक्ष रविंद्र अहिवळे, स्थैर्य लाईव्ह युट्युब चॅनेलचे चैतन्य रुद्रभटे, प्रा. शिवलाल गावडे, तांत्रिक कामगार युनियन पतसंस्था, साताराचे संचालक शरदराव मोरे वगैरे उपस्थित होते.
करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश एकजूट होऊन या संकटाशी सामना करीत असताना आपण समाज प्रबोधनासाठी वृत्तपत्रांचा माध्यमातून केलेले प्रयत्न अतुलनीय आहे, सर्व समाज घटकांसाठी आपण करीत असलेल्या या मानव सेवेबद्दल आपणास मानवाधिकार संरक्षण समितीच्यावतीने सन्मानित करण्यात येत असल्याची भावना यावेळी जी. एम. भगत यांनी व्यक्त केली.
या संस्थेच्यावतीने फलटण शहर व तालुक्यातील पत्रकार, नगरसेवक, पोलीस व प्रशासनातील अधिकारी, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, आशा व आरोग्य सेविका वगैरेंना सन्मानित करण्यात येत असल्याचे यावेळी समितीचे प. महाराष्ट्र जन संपर्काधिकारी भगत यांनी निदर्शनास आणून दिले.