‘आजचा दिवस फक्त’ (व्यसनमुक्तीची संघर्ष गाथा) पुस्तकास पुरस्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । मराठा मंदिर साहित्य शाखेच्या वतीने नवोदित लेखकांसाठी प्रथम साहित्य लेखन पुस्तक प्रकाशन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातून अनेक नवोदित लेखकांनी आपली पुस्तके स्पर्धेसाठी पाठवली होती. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मराठा मंदिर सभागृहात पार पडला. या सोहळ्यासाठी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि राज्यसभा खासदार पद्मश्री श्री कुमार केतकर उपस्थित होते. ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री जयसिंगराव पवार यांचा सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात व्यसनमुक्तीचे विनामानधन कार्य करणारे रमेश सांगळे यांनी स्वतःच्या जीवनावर लिहिलेल्या आजचा दिवस फक्त‘ (व्यसनमुक्तीची संघर्ष गाथा) या पुस्तकास पुरस्कार मिळाला आहे.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ साहित्यिका आणि वृत्तपत्र लेखीका श्रीमती मंदाकिनी भट यांनी ही जबाबदारी पार पाडली. मराठा मंदिर साहित्य शाखेचे खजिनदार श्री संतोष घाग यांच्या हस्ते सांगळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

या पुरस्काराबाबत रमेश सांगळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मला माझी दिवंगत पत्नी नंदा हिच्याकडून मिळाली. हा पुरस्कार मी तिला सन्मानपूर्वक बहाल करीत आहे. तसेच आगामी काळात व्यसनांच्या संदर्भातच पुस्तक लिखाण करणार आहे.

या सोहळ्यासाठी व्यासपीठावर पद्मश्री श्री कुमार केतकर, श्री जयसिंगराव पवार यांच्यासोबत अखिल भारतीय मराठा महासंघाचे ऍड शशिकांत पवार, संस्थेचे उपाध्यक्ष श्री विलासराव देशमुख, चिटणीस श्री राजेंद्र गावडे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!