
वैराटगडाचा पायथा 2300 फळरोपांनी बहरला : आसले ग्रामस्थांचे कष्ट फळाला
स्थैर्य, भुईंज, दि. 20 : आसले, ता. वाई येथील श्री भवानी देवीच्या मंदिरामागील डोंगरपायथ्याला तब्बल 2300 फळरोपांची लागवड बहरली आहे. दोन वर्षांपूर्वी संपूर्ण गावाच्या पुढाकारातून झालेल्या या वृक्षलागवडीतून वैराटगडाचा पायथा विविध फळांच्या वृक्षांनी बहरला असून भवानीदेवीच्या मंदिर परिसरात जणू हिरवाईचा जागर करत आहे. वैराटगडाच्या पायथ्याला गोंधळवाडी (आसले) येथे श्री भवानी देवीचे मंदिर आहे. या देवस्थानला मोठा पौराणिक, ऐतिहासिक वारसा असून छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात येवून गेल्याचे दाखले दिले जातात. या मंदिराच्या पाठिमागे आसले ग्रामपंचायतीच्या मालकीची सुमारे 28 एकर जागा असून ती सर्व जागा मुरमाड आणि खडकाळ आहे. धोम धरणाच्या निर्मितीनंतर या परिसरातून कालवा गेल्यानंतर या परिसरात काही प्रमाणावर क्षेत्र लागवडीखाली आले असले तरी मंदिर परिसरात मात्र उजाड रानच होते.
दोन वर्षांपूर्वी या परिसरात फळरोप लागवडीचा निश्चय करण्यात आला. त्यास सर्व ग्रामपंचायतीचा होकार मिळवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. लावायची ती फळरोपेच असा निर्धार करुन ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापिठात जावून रोपे आणली. त्यामध्ये 3 प्रकारचे आंबे, करवंद, बहाडोली जांभूळ, पुरंदर सिताफळ, ड्रॅगन फ्रूट, कापा फणस, नरेंद्र आवळा, चिंच, हादगा, लाल पेरु, दोन प्रकारचे नारळ अशा विविध फळांच्या रोपांचा समावेश होता. रोपे आणल्यानंतर लगोलग मंदिरामागे पाच एकर जागेत 2300 खड्डे नियोजनबद्ध पद्धतीने खाणण्यात आले. त्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला.
फळरोपांची लागवड केल्यानंतर ती रोपे जगवणे हेच सर्वात मोठे आव्हान होते. मात्र, त्या कसोटीला पुरेपूर उतरण्यासाठी अहोरात्र राबण्याची तयारी ठेवण्यात आली. सर्वात मोठा प्रश्न होता तो पाण्याचा. मंदिर परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीतून पाईपद्वारे पाणी देण्यात येत होते. मात्र, ते अपुरे पडत असल्याने दोन मोठ्या टाक्या देणगी म्हणून मिळवल्या. ठिबक सिंचन करुन पुरेसे पाणी उपलब्ध केले. पुर्णत: नैसर्गिक पद्धतीने फळरोपांची जपणूक आणि वाढ करण्याचे पहिल्यापासून ठरले होते आणि ते अंमलातही आणले.
दोन वर्षांनंतर या सर्व मेहनतीला खूप चांगले फळ आले आहे. या ठिकाणी आता विशेषत: आंबा, करवंद, सिताफळ ही फळे झाडांना लगडली असून विशेषत: लिंबाच्या आकाराची भली मोठी रसरशीत कोकण गोल्ड, जातीची करवंदे विशेष आकर्षण ठरत आहेत. ग्रामपंचायतीच्या जागेत, मंदिराच्या परिसरात अशाप्रकारची फळबाग रुजवणे, जोपासणे आणि वाढवणे हा अतिशय दुर्मिळ असा प्रयोग आहे. एकीच्या बळातून, पर्यावरणाच्या तळमळीतून, वृक्षवल्लीच्या जीवभावातून साकारलेला आणि यशस्वी झालेला हा प्रयत्न त्यामुळेच अनेकांच्या कौतुकाचा कुतूहलाचा विषय ठरत आहे.
शेततळ्याची निर्मिती करणारकिसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी नुकतीच या परिसराला भेट देवून सर्व परिसराची पाहणी केली. योग्य पद्धतीने केलेली लागवड आणि सेंद्रीय पद्धतीचा केलेला अवलंब याबाबत विशेष आनंद व्यक्त करुन ते म्हणाले, आसले ग्रामस्थांचा हा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रातील जागा उपलब्ध असलेल्या ग्रामपंचायतींना, संस्थांना प्रेरणा देणारा आहे. पर्यावरणाची होणारी हानी चूकच. मात्र आसले येथील गोंधळवाडीत सार्वजनिक जागेत, सामूहिक प्रयत्नातून विशेषतः आसले ग्रामपंचायत समस्त युवक, ग्रामस्थ, सर्व देणगीदार यांच्या सहकार्यातुन प्रयत्नातुन बहरलेली शेकडो झाडं नक्की कौतुक करावीत अशी आहेत. या ठिकाणी शेततळ्याची निर्मिती करणार असून त्यातून या फळबागेला पाणी उपलब्ध होण्यासोबत आणखी काही क्षेत्रावर निश्चितपणे फळबाग निर्माण होईल असा विश्वास त्यांनी राजेंद्र वाघ, विजय वाघ व ग्रामस्थांशी बोलताना व्यक्त केला.
स्वप्न सत्यात साकारलेअनेकांनी सहकार्याचा हात पुढे केला त्यामुळे हे स्वप्नवत काम सत्यात साकारले आहे. या कामासाठी अरविंद पोरे यांनी सर्वप्रथम मोठा मदतीचा हात देत दरवर्षी या कामासाठी मदत करण्याची ग्वाही दिली. श्रेया मिलिंद वाघ या मुलीने वाढदिनी 200 फळरोपांचे रोपण करुन इतरांना प्रेरणा दिली. तसेच जीवन वाघ, विकास निगडे, सागर वाघ, फौजी जगताप, पाचवड येथील गायकवाड परिवार, माजी सरपंच अनिल चव्हाण, विद्यमान सरपंच कल्पना वाघ, ग्रामसेविका ढमाळ, देशमुख यांनी वेळोवेळी मदतीची, सहकार्याची भूमिका घेत संपूर्ण आसले ग्रामस्थांनी पाहिलेले हिरवाईचे स्वप्न साकारले असल्याचे राजेंद्र खंडेराव वाघ यांनी सांगितले.