
स्थैर्य, फलटण, दि. १४ फेब्रुवारी : माऊली फाउंडेशनच्या संस्थापिका तथा फलटण नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माऊली फाउंडेशनच्या वतीने एक अनोखा आणि स्तुत्य सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय साहित्य गोळा करून त्याचे वाटप करण्यात येणार आहे.
अनेक घरांमध्ये आजारपणानंतर किंवा उपचारांनंतर मेडिकल बेड, वॉकर, व्हीलचेअर यांसारख्या वस्तूंचा वापर थांबतो. त्यानंतर या वस्तू घरात निरुपयोगी म्हणून किंवा अडगळीत पडून राहतात. मात्र, याच वस्तूंची दुसऱ्या एखाद्या गरीब रुग्णाला नितांत आवश्यकता असू शकते. हीच बाब ओळखून, पडून असलेल्या या वस्तू गोळा करून त्या समाजातील खऱ्या गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम माऊली फाउंडेशन करणार आहे.
ज्या नागरिकांकडे अशा प्रकारच्या वस्तू (मेडिकल बेड, वॉकर, व्हीलचेअर इ.) घरामध्ये उपलब्ध आहेत आणि त्यांना त्या गरजूंना दान करावयाच्या आहेत किंवा माफक दरात द्यावयाच्या (विकायच्या) आहेत, त्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन फाउंडेशनशी संपर्क साधावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
या विधायक व समाजपयोगी उपक्रमास फलटणकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन माऊली फाउंडेशनच्या सदस्या रुपाली साळुंखे, संगीता भोसले, मीनाक्षी लाळगे, हिना शेख, इशरत मिटकरी, सना शेख, अंजुम शेख, लता यादव, रेखा यादव, हेमा पोद्दार, भाग्यश्री जेबले, रोहिणी डमकले, संगीता देशमाने, मनीषा करवा, चांडक भाभी आणि स्वाती कदम यांनी केले आहे.
