विद्यार्थ्यांची गैरसोय टाळा; श्रीमंत संजीवराजेंच्या फलटण एसटी महामंडळाला सुचना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑगस्ट २०२२ । फलटण । कोरोना महामारी व कर्मचारी संप यामुळे तालुक्यातील एस.टी.सुविधा ठप्प झाली होती. मात्र ही परिस्थिती सुधारली तरी अद्याप तालुक्यातील काही वाड्या – वस्त्यांवर एस.टी.ची सुविधा पुर्ववत झाली नसल्याने विशेषत: शिक्षणासाठी दररोज प्रवास करावा लागणार्‍या विद्यार्थी वर्गाला या असुविधेचा मोठा फटका बसत आहे. विद्यार्थ्यांची ही गैरसोय लक्षात घेऊन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्वत: पुढाकार घेत फलटण आगार व्यवस्थापनाला कोलमडलेले वेळापत्रक सुधारण्याच्या सूचना केल्या आहेत.

मागील काही काळापासून कोरोना महामारीमुळे शाळा व महाविद्यालये बंद होती. कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर शाळा, महाविद्यालये सुरु झाली मात्र याच दरम्यान एस.टी. कर्मचार्‍यांचा संप झाल्याने मोठ्या काळासाठी एस.टी. सुविधा ठप्पच राहिली होती. त्यामुळे ग्रामिण भागातून शहराकडे येणार्‍या विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. त्यानंतर एस.टी. कर्मचार्‍यांचे आंदोलन संपले मात्र फलटण आगाराकडून तालुक्यातील ग्रामीण भागात पहिल्याप्रमाणे सुविधा सुरु केली नसल्याने अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी एस.टी. सुविधेच्या प्रतिक्षेत आहेत. काहींना पायपीट करत तर काहींना मिळेल त्या वाहनाने शाळा, महाविद्यालय गाठावे लागत आहे. याचा त्रास विद्यार्थ्यांना होत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकातून नाराजीचा सूर सुरु आहे.

याबाबतची दखल घेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिपकरावजी चव्हाण यांनी काल, दि 13 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ फलटण आगार व्यवस्थापक रोहित नाईक, फलटण आगार अधिक्षक वाडेकर व फलटण शहरातील शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य यांची संयुक्त बैठक मुधोजी हायस्कूल येथे घेवून योग्य त्या सूचना व मागण्या केल्या.

यामध्ये सकाळी 7:00 वाजेपर्यंत फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एस.टी. ने फलटण शहरात पोहोचता येईल अशी वाहतूक व्यवस्था करावी. एस.टी.बसेस ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच सोडाव्यात. विद्यार्थ्यांना एस.टी. पास देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. विद्यार्थ्यांना वेळेत घरी जाता यावे यासाठी शाळा, महाविद्यालयांच्या सुटण्याच्या वेळेनुसार एस.टी.बसेसचे नियोजन करावे. फलटण एस.टी.स्टँड ते जिंती नाका तसेच फलटण एस.टी. स्टँड ते मुधोजी कॉलेज या प्रवासासाठही विद्यार्थी पासची व्यवस्था करावी, आदींचा समावेश होता.

मुधोजी महाविद्यालय, मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, यशवंतराव चव्हाण हायस्कूल फलटण, कृषी महाविद्यालय फलटणच्या प्राचार्यांनी विद्यार्थांना होणार्‍या गैरसोयीबाबत सविस्तर माहिती दिली.

बैठकीदरम्यान फलटण आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांनी वरील सर्व सूचनांची व्यवस्था आणि पुर्तता दि. 17 ऑगस्ट 2022 पासून नियमित केली जाईल अशी ग्वाही दिली.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ताबापु अनपट, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष जयकुमार इंगळे, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य बी. एम. गंगवणे, मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य कोळेकर, मुधोजी महाविद्यालयाचे प्रतिनिधी लामकाने, यशवंतराव चव्हाण हायस्कूलचे प्राचार्य थोरात, कृषी महाविद्यालय प्रतिनिधी कुलाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

आभार प्राचार्य बी.एम.गंगवणे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!