दैनिक स्थैर्य | दि. २७ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
फलटण येथे साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन आयोजित चौथे राज्यस्तरीय युवा स्पंदन साहित्य संमेलन दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या संमेलनाचे औचित्य साधून कवी अविनाश चव्हाण यांना ‘युवा कवी’ किताब देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष कवीवर्य प्रदिप कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई, सदस्य श्री. रवींद्र बेडकिहाळ, ज्येष्ठ पत्रकार अरविंद भाई मेहता तसेच साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशनचे अध्यक्ष व सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक ताराचंद आवळे सर, ज्येष्ठ पत्रकार श्री. रमेश आढाव सर, फलटण मार्केट कमिटीचे सचिव श्री. सोनवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक ताराचंद आवळे सर म्हणाले की, कवी अविनाश चव्हाण यांची यापूर्वीच गुगलने ‘युवा कवी’ म्हणून दखल घेतली आहे. साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन या आमच्या संस्थेने त्यांना ‘युवा कवी’ हा अधिकृत किताब देण्याचे योजिले होते आणि त्यानुसार आज आम्ही त्यांना ‘युवा कवी’ किताब प्रदान करीत आहोत आणि याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे, तर ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र बेडकिहाळ म्हणाले की, कवी अविनाश चव्हाण यांच्या कविता काव्यरसिकांच्या मनाचा अचूक ठाव घेतात. त्यांच्या कवितेतील अपरिमित दुःख आणि वेदना हे काव्य रसिकांचे मन वेधून घेते. ज्येष्ठ पत्रकार रमेश आढाव सर म्हणाले की, ‘गुगल’वरचा कवी म्हणून आम्हाला कवी अविनाश चव्हाण यांचा सार्थ अभिमान वाटतो. ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई यांनी युवा कवी अविनाश चव्हाण यांच्या पाठीवर कौतुकाने थाप दिली आणि म्हणाले की, ग्रामीण भागातील कवींच्या कवितांमध्ये आज खरा दर्जा दिसून येतो. त्यांना कोणत्याही मोठ्या तामझामाची आवश्यकता भासत नाही.
यावेळी किताबाचे वाचन युवा लेखक श्री. आकाश आढाव यांनी केले. यावेळी युवा कवी अविनाश चव्हाण यांचे कुटुंबीय प्रामुख्याने उपस्थित होते. याच कार्यक्रमात त्यांच्या ‘प्रीतीचे दुःख’ या मराठी गीताचे औपचारिक अनावरण करण्यात आले. सदरचे गीत सर्व मुझिकल प्लॅटफॉर्म वरती लवकरच उपलब्ध होईल, असे प्रतिपादन युवा कवी अविनाश चव्हाण यांनी याप्रसंगी बोलताना केले.
कवी अविनाश चव्हाण यांना ‘युवा कवी’ किताब प्रदान करण्यात आल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून तसेच साहित्य व काव्यप्रेमींकडून विशेष अभिनंदन होत आहे.