
स्थैर्य, सातारा, दि. 4 डिसेंबर : जिल्ह्यातील सात नगरपालिका व एकानगरपंचायतीसाठी आज झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेत सर्व नगरपालिकांचे मिळून सरासरी 74 टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. मेढ्यामध्ये सर्वाधिक 84.20 टक्के, तर सर्वात कमी सातार्यात 58.60 टक्के मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता एकंदर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. नागरिक उशिरा बाहेर पडल्यामुळे मोजक्या ठिकाणी रात्री आठनंतरही मतदान सुरू होते. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या नागरी भागाच्या विकासाचा गाडा हाकणार्या 203 नगरसेवक व आठ नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? हे पाहण्यासाठी सर्वच पक्ष व उमेदवारांना 18 दिवस देव पाण्यात ठेवावे लागणार आहेत. कार्यकत्यांना गुलाल उधळण्यासाठी 21 डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जिल्ह्यातील सातारा, कर्हाड, मलकापूर, म्हसवड, फलटण, रहिमतपूर, वाई, पाचगणी व महाबळेश्वर नऊ पालिका व मेढा नगरपंचायतीसाठी चार नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागली. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीच्या घटकपक्षांची रणधुमाळी सुरू झाली. गेल्या नऊ वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. त्यामुळे निवडणूक जाहीर होताच सर्वच इच्छुक व त्यांच्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी संधी न मिळालेले कार्यकर्ते बंडखोरी करत निवडणुकीला सामोरे गेले. स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व राखण्यासाठी महायुतीमधील घटक पक्षांबरोबरच काही ठिकाणी महाविकास आघाडीतही फूट पडली. त्यामुळे एकंदर निवडणुकीची रंगत वाढली होती. त्यातच मतदानाच्या दोन दिवस अगोदर जिल्ह्यातील फलटण व महाबळेश्वर पालिकेची निवडणूक पुढे ढकलली गेली. त्यामुळे आज जिल्ह्यातील सात नगरपालिका व एका नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी साडेसातपासून मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली.
सकाळी सर्वच पालिकांच्या मतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी झाली होती. साडेअकरापर्यंत 15 ते 25 टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते. त्यानंतर मतदानाची प्रक्रिया काहीशी थंडावली. दीडनंतर पुन्हा वेग वाढला. दुपारी साडेतीनपर्यंत सरासरी 49 टक्के मतदान झाले होते. सर्वाधिक मतदान मेढा नगरपंचायतीसाठी 73.72 टक्के झाले होते. त्यापाठोपाठ रहिमतपूरला 65.57, तर म्हसवड पालिकेसाठी 57.20 टक्के मतदान झाले होते. सातारा पालिकेसाठी साडेतीनपर्यंत 43.77, तर कन्हर्हाड पालिकेसाठी 50.50 टक्के, तर मलकापूरला 52.69 टक्के मतदान झाले होते. अन्य पालिकांच्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी 40 च्या आत होती. सायंकाळीचारनंतर मतदानाचा वेग वाढला. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात सर्वच इच्छुकांच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. त्यामध्ये काही ठिकाणी किरकोळ मारामारी व बाचाबाचीच्या घटना घडल्या. बहुतांश मतदान केंद्रांवर सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान होत आले होते; परंतु काही ठिकाणी मतदार उशिरा आल्यामुळे मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. त्या-त्या केंद्रावरील प्रमुखांनी साडेपाचपर्यंत आलेल्या सर्व मतदारांना मतदान केंद्रात प्रवेश दिला. त्यामुळे काही पालिकांमध्ये रात्री आठनंतरही मतदान सुरू होते. सातार्यात 47 नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी मतदान झाले. मतदान प्रक्रियेदरम्यान प्रभाग पाच व 18 मध्ये मारामारीच्या घटना घडल्या, तर 14 मध्ये उमेदवार व समर्थकांत वादावादी झाली. प्रभाग तीनमध्ये मतदार यादीतील नाव शोधण्यावरून गोंधळ निर्माण झाला होता. दोन प्रभागांत मतदान यंत्रात तांत्रिक बिघाडामुळे मतदानाला काहीसा उशीर झाला. पालिकेसाठी 58.60 टक्के मतदान झाले. कर्हाडमध्ये 31 नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी मतदान झाले. सकाळपासूनच नागरिकांमध्ये उत्साह होता. चारनंतर गर्दीत मोठी वाढ झाली. एका प्रभागात सायंकाळी सातपर्यंत मतदान सुरू होते. एकंदर प्रक्रिया शांततेत पार पडली. मलकापूरमध्ये पाच नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे 17 नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी मतदान झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या प्रभागात चुरस होती. उर्वरित ठिकाणी मतदारांमध्ये काहीसा निरुत्साह होता. तेथे शांततेत मतदान झाले.
वाईमध्ये एक नगरसेवक बिनविरोध झाला होता. त्यामुळे 22 नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी मतदान झाले. या ठिकाणी गंगापुरी व सोनगीरवाडी येथे झालेली वादावादी वगळता उर्वरित ठिकाणी शांततेत मतदान झाले. वादावादीमुळे रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. तीन ठिकाणी मतदान यंत्रातील तांत्रिक बिघाडामुळे मतदानाला विलंब झाला. प्रभाग दोनमध्ये रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. म्हसवड पालिकेत 20 नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी मतदान झाले. दोन मतदान केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. प्रतिष्ठेची लढत असल्यामुळे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे दिवसभर ठाण मांडून होते. मतदानाच्या पूर्वसंध्येला मारामारी झाल्याने आज मोठा बंदोबस्त नेमण्यात आला होता. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. रहिमतपूरमध्येही शांततेत 81.20 टक्के मतदान झाले. येथे 20 नगरसेवक व नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले. मेढ्यामध्ये एका ठिकाणी भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत वादावादी झाली. या ठिकाणी नगराध्यपदासह 16 जागांसाठी 84.23 टक्के मतदान झाले. सायंकाळी बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी भेट दिली.
पाचगणीमध्ये 20 नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी मतदान झाले. मतदार उशिरा बाहेर पडले. त्यामुळे काही प्रभागात रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. एकंदर प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यातील पालिकांसाठीच्या आठ नगराध्यक्षांसह 203 नगरसेवकांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. पूर्वी जाहीर झाल्यानुसार उद्या (ता. तीन) मतमोजणी होणार होती; परंतु काही ठिकाणच्या निवडणुका निवडणूक आयोगाने 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. त्यांची मतमोजणी 21 डिसेंबरला आहे. त्यामुळे सर्व पालिकांचे निकाल 21 डिसेंबरला जाहीर करण्याबाबत काही जण उच्च न्यायालयात गेले होते. त्यांच्या मागणीनुसार न्यायालयाने सर्वच पालिकांची मतमोजणी 21 डिसेंबरला ठेवली आहे. त्यामुळे इच्छुकांना 17 दिवस देव पाण्यात ठेवावे लागणार आहेत.

