उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्याने धरणाचा बांध तुटला, 100-150 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता; 3 मृतदेह सापडले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, देहरादून, दि. ७: उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्याने धरणाचा बांध तुटला आहे. राज्याच्या चमोलीमध्ये ही घटना घडली. यामुळे मोठे नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्याच्या रैणी गावाजवळ धरणाचा बांध फुटला. प्रशासनाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. यामध्ये अनेक घरांचे नुकसान झाले असून, ऋषिगंगा पॉवर प्रोजेक्टचे मोठे नुकसान झाले आहेत. तसेच, येथील 100-150 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत असून, 3 जणांचे मृतदेह सापडले आहेत.

उत्तराखंडचे महासचिव ओमप्रकाश यांनी सांगितले की, दुर्घटनेमध्ये 100 ते 150 लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. चमोलीच्या तपोवन परिसरात झालेल्या या घटनेने ऋषिगंगा पॉवर प्रोजेक्टला प्रचंड नुकसान पोहोचले आहे. येथे काम करणारे अनेक मजूर बेपत्ता आहेत. नदीच्या किनाऱ्यावरील अनेक घरे ही पाण्यात वाहून गेली आहेत. आजुबाजूची गावे रिकामी करण्यात आली आहेत. ऋषिगंगा व्यतिरित्त एनटीपीसीच्या एका प्रोजेक्टलाही नुकसान पोहोचले आहे. तपोवन बैराज, श्रीनगर डॅम आणि ऋषिकेश धरणाचेही नुकसान झाले आहे.

आज सकाळी 10.55 वाजता ही दुर्घटना घडली. हिमकडा कोसळल्याने नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. या पुरामुळे धरणाचा बांध तुटला आहे. यामुळे या ठिकाणी पाणीच पाणी झाले आहे. अनेक घरे आणि माणसे वाहून गेले असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. निसर्गाच्या या प्रकोपामुळे उत्तराखंडमध्ये एकच हाहाकार माजला आहे. या ठिकाणी अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

गृहमंत्री अमित शहांचे मदतीचे आश्वासन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली असून, त्यांनी तातडीने मुख्यमंत्री रावत यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. तसेच, सर्व प्रकारची मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, आयटीबीपी आणि एनडीआरएफच्या टीमही उत्तराखंडला पाठवण्यात येत असल्याचे शहांनी सांगितले.

अफवांवर विश्वास ठेवू नका

या संपूर्ण घटनेवर मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चमोली जिल्ह्यातमध्ये ही दुर्घटना घडली असल्याचे वृत्त आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि आपत्कालीन विभागांना आपत्ती निवारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. खबरादारीचे सर्व उपाय केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

तपोवन रैणी परिसरात हिमकडा तुलटी यामुळे ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टला मोठी हानी झाली आहे. नदीची पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे अलकनंदा नदीच्या किनारी असलेल्यांनी लवकरात लवकर दुसरीकडे शिफ्ट व्हावे असे आवाहन चमोली पोलिसांकडून करण्यात आले आहे.

चमोली पोलिसांनुसार, ऋषिगंगा पॉवर प्रोजेक्टलाही नुकसान झाले आहे. येथे काम करणारे मजूरही गायब आहेत. दुसरीकडे अलकनंदा नदीच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे.

जून 2013 मध्ये झालेल्या दुर्घटनेत 4 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता

16-17 जून 2013 ला ढगफुटी झाल्याने रुद्रप्रयाग, चमोली, उत्तरकाशी, बागेश्वर, अल्मोड़ा, पिथौरागड जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली होती. त्या दुर्घटनेत 4,400 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच, 4,200 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला होता. याशिवाय, 11हजार 091 पेक्षा जास्त प्राण्यांचाही यात मृत्यू झाला होता.


Back to top button
Don`t copy text!