दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२३ । सातारा । संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील( चांभार, ढोर, होलार, मोची इत्यादी) यांचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी विविध कर्ज योजना यामार्फत राबविल्या जातात. महामंडळामार्फत सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या (एन.एस.एफ.डी.सी.) योजना राबविण्यात येत असून 4800 लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. याचा चर्मकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.
एन.एस.एफ.डी.सी. नवी दिल्ली यांच्या मुदती कर्ज योजने अंतर्गत स्मॉल बिझनेस रु.एक लाख, 1 लाख 50 हजार, व दोन लाख , चर्मोद्योग रु.दोन लाख, लघुऋण वित्त योजना व महिला समृध्दी योजना प्रत्येकी रु.50 हजार या योजनांसाठी मागील प्रलंबित नस्तींकरिता रु.22 कोटी 21 लाख इतका निधी प्राप्त झालेला आहे.
तसेच सन 2023-24 या आर्थिक वर्षात एन.एस.एफ.डी.सी. यांच्या मुदती कर्ज योजने अंतर्गत स्मॉल बिझनेस पाच लाख, लघुऋण वित्त योजना व महिला समृध्दी योजना प्रत्येकी रु.1 लाख 40 हजार तसेच नवीन महिला अधिकारीता योजना रु.5 लाख मंजूर झालेल्या आहेत.
एन.एस.एफ.डी.सी. यांच्या शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये वाढ झाली असून भारतामध्ये रु.2 लाख व विदेशामध्ये रु.30 लाखापर्यंत कर्ज मंजूर करण्यात येईल. अधिक माहितीसाठी नजीकच्या महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास भेट द्यावी, व या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकिय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.