दैनिक स्थैर्य । दि. १६ फेब्रुवारी २०२३ । सातारा । विविध ऑटोरिक्षा संघटना यांनी केलेल्या मागणीवरुन प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, सातारा यांनी परिचलन बैठकीत फेर विचार करुन ऑटोरिक्षा भाडे दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी कळविले आहे.
ऑटोरिक्षाकरिता प्रतिकिमी देय भाडे रु.20.08 पूर्णांकात देय भाडे रु.20.00 ऑटोरिक्षाकरिता किमान देय भाडे 1.5 कि.मी. साठी किमान देय भाडे रु.30.12 पूर्णांकात देयक भाडे रु.30.00. रात्री 11.00 ते पहाटे 05.00 या कालावधीसाठी आकरावयाचे अतिरिक्त भाडे 40 टक्के निश्चित करण्यात आले आहे. 14 किलोपर्यंतच्या नगास भाडे आकारण्यात येणार नाही तथापी त्यापेक्षा जास्त वजनाच्या प्रत्येक नगास 03.00 आकारण्यात येईल. सुधारीत भाडे दर अंमलबजावणीकरिता दिनांक 16 फेब्रुवारी 2023 च्या पहाटेपासून लागू होईल. ज्या रिक्षाचे मिटरचे नवीन दराने कॅलिब्रेशन होऊन मिटर सिल झाले आहे त्यानांच नवीन दराने भाडे स्विकारता येईल. कॅलिब्रेशन व मीटर सिल होईपर्यंत जुन्या दरानेच भाडे स्विकारावयाचे आहे. भाडे रचना सुधारणा करण्यासाठी मीटरच्या पुनर्प्रमाणिकरणास दिनांक 16 फेब्रुवारी ते 1 एप्रिल 2023 इतका पंचेचाळीस दिवसांचा कालावधी आहे.
सातारा जिलह्यात ज्या ठिकाणी जास्त रिक्षा प्रवासी वाहतूक आहे त्या त्या ठिकाणी रिक्षा भाडे प्रदर्शित करावे.
रिक्षा ई-मीटर पुनर्प्रमाणिकरण (रिकॅलीब्रेशन-फेर बदल) विहित कालावधीमध्ये न केल्यास मोटार वाहन कायदा 1989 च्या कलम 86 अंतर्गत परिवहन प्राधिकरणाला असलेल्या अधिकारानुसार विभागीय कार्यवाही होणे आवश्यक असल्याने पुढे दर्शविलेल्या सूचीनुसार विभागीय कार्यवाही करण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.
विहित मुदतीत कॅलीब्रेशन न केल्यास 5दिवस परवाना निलंबन किंवा निलंबनाऐवजी तडजोड शुल्क 500 रुपये असेल, याची जिल्ह्यातील सर्व ऑटोरिक्षा वाहन धारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही श्री. चव्हाण यांनी केले आहे.