स्थैर्य, औंध, दि.१3: प्रशासनाने घालून दिलेल्या अटी शर्ती नुसार कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी औंध येथील मूळपीठ निवासिनी आणि ग्रामनिवासिनी श्रीयमाईदेवीचे मंदिर 13 जानेवारी ते 4 फेब्रुवारी अखेर मंदिर बंद राहील अशी माहिती मूळपीठ देवस्थानच्या मुख्य विश्वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी दिली.भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
यात्रा उत्सव आणि मकरसंक्रांत उत्सवाबाबत नुकतीच राजवाडा येथे गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपविभागीय अधिकारी शैलेश सुर्यवंशी, सरपंच सोनाली मिठारी सपोनि उत्तमराव भापकर, उपसरपंच दीपक नलवडे, हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने,आब्बास आत्तार, मंडलाधिकारी गजानन कुलकर्णी, सागर गुरव यांच्या उपस्थितीत समन्वयक बैठक पार पडली
14 जानेवारी रोजी मकरसंक्रांतीचा सण आहे आणि संक्रातीला वाण वसा घेण्यासाठी औंधसह जिल्ह्यातून आणि परजिल्हयातून मोठ्या प्रमाणावर महिला भाविक औंधला येतात. तसेच 15 जानेवारी पासून पौषी उत्सवातील धार्मिक विधीला (भोगी ) सुरवात होते. त्यामुळे भाविक आणि ग्रामस्थ लाखोच्या संख्येने दर्शनासाठी मंदिरात येत असतात. मात्र कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. याचा प्रादुर्भाव होऊ नये. भाविकांना याचा त्रास होऊ नये याकरिता शासनाने यात्रा उत्सव साजरे करण्यासाठी निर्बंध घातले आहेत. शासनाने दिलेल्या नियमानुसार वरील काळात मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहील. भाविकांनी आणि ग्रामस्थांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी केले आहे.