मथुरा येथील वाईल्डलाईफ केअर सेंटरमध्ये आज सकाळी निधन
स्थैर्य, सातारा, दि. १५ : औंध संस्थानची अस्मिता आणि जनतेशी भावनिक नाळ असलेला लाडका गजराज उर्फ मोतीने आज सर्वांचाच निरोप घेतला. आज सकाळी त्याचे मथुरा येथील वाईल्डलाईफ एसओएस केअर सेंटर येथे निधन झाले. गजराज गेल्याची बातमी औंधसह पंचक्रोशितील अनेक गावांमध्ये सकाळी वाऱ्यासारखी पसरल्याने बुधवारी दिवसभर सर्वत्र निरव शांतता पसरली होती.
औंधच्या ग्रामस्थांशी जिव्हाळ्याचे नाते असलेल्या गजराजाची पेटा संस्थेने फेसबुक वर व्यवस्थित देखभाल होत नाही. याबद्दल तक्रार करुन हस्तांतरण करण्याची मागणी केेली होती. हत्तीची मालकी असलेल्या औंध संस्थानच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी देखील सुरवातीला गजराजच्या हस्तांतरणला विरोध दर्शविला होता. परंतु हत्तीसाठी पेटाचा तगादा आणि कायदेशीर दृष्ट्या वाईल्ड लाईफ कायद्यानुसार येणाऱ्या अडचणी मुळे त्यांनी नमते घेऊन जीवावर दगड ठेवून हत्ती नेहण्यासाठी सकारात्मकता दर्शवली होती. औंध मधून हत्ती जाणार ही भूमिका न पटल्याने चवताळललेल्या ग्रामस्थांनी निषेध मोर्चा काढून आपल्या भावनाही व्यक्त केल्या होती परंतु पेटा संस्थेच्या हटवादी भूमिकेमुळे 14 जून 2017 रोजी औंधकरांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून साश्रूपूर्ण नयनांनी लाडक्या मोतीला निरोप दिला होता.
गेली पाच दशके येथील जनतेशी आणि मातीशी नाळ घट्ट असलेल्या गजराजाने मात्र औंध सोडून जाण्यास चक्क नकार दिला होता. अनेक प्रयत्न करुनही गजराज मथुरा वाईल्ड लाईफच्या गाडीत पाऊल टाकत नसल्याने प्रशासन हतबल झाले होते. साडेचार तासांच्या अथक परिश्रमानंतर मोती एका ट्रकमध्ये चढल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला होता. गेली तीन वर्षे तो मथुरा येथील वाईल्डलाईफ एसओएस केअर सेंटर येथे वास्तव्य होते. तेथे त्याची देखभाल केली जात होती. दरवर्षी न चुकता गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी आपल्या मुलीसह मथुरेला जाऊन लाडक्या गजराजला भेटून येत होत्या.
औंध संस्थान आणि हत्ती असे समिकरण झाले होते. यापूर्वी देखील श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या पदरी टिपूसुलतान नावाचा हत्ती होता. त्यांच्या मृत्यूनंतर रामप्रसाद नावाचा हत्ती औंधमध्ये आणला रामप्रसादच्या निधनानंतर नंतर काही काळ औंध संस्थांंनात हत्ती नव्हता. दरम्यान श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांच्या काळात इंदोर हून आणलेल्या गजराज उर्फ मोतीची नाळ येथील राजघराण्यातील सदस्याबरोबर जनतेशी घट्ट झाली होती. त्यामुळे त्याने येथील जनतेच्या हदयात अढळ स्थान निर्माण केले होते. श्रीपतराव पंतप्रतिनिधी,बाळराजे यांच्या अकाली निधनानंतर कौटुंबिक अडचणीत असलेल्या गायत्रीदेवीनी लाडक्या मोतीची कधीच आबाळ होऊ दिली नाही. 25 वर्षे कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्याचे संगोपन केले होते. त्यामुळे कधीही त्यांनी गजराज म्हणून हाक मारली तर सोंड वर करून मोती त्यांच्या आवाजाला प्रतिसाद देत असे. अगदी स्वतःच्या मुलीप्रमाणे त्या मोतीची गळाभेट घेऊन कुरवाळीत असत. त्याचे औंषधपाणी, चारा याबाबतीत त्या दक्ष असत. मधल्या काळात त्याला गँस्ट्रोचा त्रास झाल्यामुळे त्याची प्रक्रुती खालावली होती मात्र मोतीच्या आजाराने सैरभैर झालेल्या गायत्रीदेवीनी केरळहून खास वैद्यकीय पथकाला पाचारण करून त्याच्यावर यशस्वी इलाज केले होते. बदलत्या वातावरणानुसार त्याच्या आहारातील बदलाची त्या काळजी घेत असत माहुताला त्याबद्दल सुचना करीत असत.
दरवर्षी त्याचा हीट पिरियड (मस्त कालवधी) वगळता तो औंधमध्ये मोकळ्या वातावरणात निवांत फिरत असे त्यामुळे लहानपणापासून आबालवृद्धांना त्याचा लळा लागला होता. फक्त मस्तच्या कालावधीत बेभान होऊन कुणाला ईजा होऊ करु नये. त्याच्या जवळ कोणी जाऊ नये यासाठी काळजी घेऊन त्याला साखळदंडाने बांधून ठेवण्यात येत असे.
आज सकाळी जेव्हा मथुरा केअर सेंटरमधून ही दुखःद बातमी गायत्रीदेवी त्यांना सांगितली तेव्हा त्यांना मोतीच्या जाण्याने मोठा धक्का बसला. मोतीच्या निधनाची बातमी औंधमध्ये वाऱ्यासारखी पसरली ग्रामस्थांनी ठिकठिकाणी लाडक्या मोतीला श्रध्दांजली अर्पण करून तीव्र शोक व्यक्त केला.
मथुरा केअर सेंटरमध्ये गजराजची गायत्रीदेवी यांनी घेतलेली गळाभेट अखेरची ठरली |
आज कुटुंबातील आणखी एक सदस्य हरपला.मोतीची आणि आमच्या कुटुंबाचे चार पिढ्यांचे भावनिक नाते होते. पेटा संस्थेच्या हटवादी भूमिकेमुळे त्याला मथुरेला पाठवावे लागले होते. मोती मथुरेला गेल्यापासून राजवाड्यात मोठी पोकळी निर्माण झाली होती. आज सकाळी त्याच्या निधनाची बातमी समजताच मोठा धक्का बसला आहे. आमच्या कुटुंबातील एक सदस्यच हरपला आहे. गेल्या आठवड्यापासून तो आजारी होता. मी दररोज केअर सेंटरच्या संपर्कात राहून माहिती घेत होते. लाँकडाऊन मुळे प्रत्यक्ष जाऊन त्याची भेट घेता आली नाही. ही खंत मनात कायम राहील. श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, अधिपती औंंध संस्थान
लोक मोतीला मिस करीत होते.गेल्या तीन वर्षांपासून 14 जूनला ग्रामस्थांना औंधमध्ये मोतीची प्रकर्षाने आठवण येत असे. खास करून दसरा, पौषी यात्रा तसेच किन्हई यात्रेतील कार्यक्रमात लोकांना त्याची उणीव जाणवत होती. आकर्षक रित्या सजवलेला मोती दिसत नसल्याने लोक हळहळ व्यक्त करीत होते.
बुधवारचा योगायोगबुधवार दि 14 जून 2017 रोजी पेटा संस्थेने त्याला मथुरेला हलवले होते. लोकांचा निरोप घेऊन जड पाऊलांनी मथुरेला गेलेल्या गजराजने आज बुधवार दि 15 रोजी सर्वांचाच निरोप घेतला. गेली पाच दशके औंधला आनंदात राहणारा गजराजला मथुरेला गेल्यावर फक्त तीन वर्षात प्राण गमवावे लागले.त्यामुळे पेटाने त्याची कशी काळजी घेतली असा सवाल औंधकरांनी उपस्थित केला आहे. बुधवारी औंध मधून गेलेल्या मोतीचे बुधवारीच निधन झाल्याने बुधवारच्या योगायोगाची सर्वत्र चर्चा सुरू होती.
फिरोज मुलाणी, 9860105786/ 9421120356