दैनिक स्थैर्य । दि. ११ मे २०२२ । औंध । औंध येथील पोलीस कोठडीचे लाँकअप तोडून पसार झालेल्या पाच दरोडेखोरांपैकी तिसरा संशयित आरोपी अजय सुभाष भोसले यास पकडण्यात पोलीसांना मंगळवारी यश आले असून पाच आरोपींपैकी दोन आरोपींंचा अद्यापही कोणताही ठावठिकाणा लागला नाही. मागील दोन दिवसांपासून आठ पोलीस टीमच्या माध्यमातून औंध परिसरातील अनेक गावे , डोंगर कपारीमध्ये पोलीसांची शोध मोहीम सुरूच आहे.
पुसेसावळी येथे जानेवारी महिन्यात पडलेल्या दरोडयाच्या तपासासाठी अजय सुभाष भोसले , सचिन सुभाष भोसले, अवि सुभाष भोसले सर्व रा.माहीजळगाव जि.अहमदनगर व राहुल ऊर्फ होमराज उद्धव काळे रा. वाकी जि.बीड, राहुल पदु भोसले रा. वाजुळ पारगाव जि.अहमदनगर यांना औंध पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी ही देण्यात आली होती. मात्र, सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास पिण्याचे पाणी मागण्याचा बहाणा करून तेथील पोलीस कर्मचारी पाणी आणण्यासाठी गेले असता पाच ही आरोपींनी ताकद लावून कोठडीचे लॉक तोडून औंध पोलीस स्टेशनमधून पळ काढला.
त्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून सोमवारी सकाळी यातील राहुल भोसले यास वरुड येथे पकडले तर सचिन भोसले याला औंध येथे पकडले.
मात्र, सोमवारी रात्री उशिरापर्यंत औंध येथील जोतिबा डोंगर, जायगाव, भोसरे, वरुड, खबालवाडी परिसर पोलिसांनी पिंजून काढला तरीही मंगळवारी सकाळपर्यंत दोन संशयित पकडण्या व्यतिरिक्त कोणतीही प्रगती तपासात झाली नव्हती. त्यानंतर मंगळवारी दुपारी खबालवाडी नजीक अजय सुभाष भोसले याला पकडण्यात पोलिसांना यश आले असून अद्यापही अवि भोसले व राहुल काळे हे दोन संशयित पसार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
अजय भोसले याला पकडण्यात पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे ,पोलीस कर्मचारी व एल सी बी पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.