जयंत केजकर यांच्या बहारदार गायनाने रसिक मंत्रमुग्ध

दि.5 फेब्रुवारी रोजी ह. भ. प. लक्ष्मीप्रसाद पटवारी यांचे कीर्तन, अमेय कारुळकर आणि श्रेयस व्यास यांचे सुश्राव्य गायन


सज्जनगड – येथील भक्त निवासात श्री समर्थ सेवा मंडळ आयोजित दासनवमी संगीत महोत्सवात गायन करताना जयंत केजकर. (छायाचित्र – अतुल देशपांडे)
स्थैर्य, 4 फेब्रुवारी, सातारा : सज्जनगडावरील श्री समर्थ सेवा मंडळ आयोजित दास नवमी संगीत महोत्सवातील दुसरे पुष्प सादर करताना सुप्रसिद्ध गायक जयंत केजकर यांनी बहारदार श्री रागाची आळवणी करत आपल्या गायनाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले .श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने सज्जनगडावरील भक्तनिवासात रंगलेल्या या सुरेल दोन तासाच्या गायन सेवेत जयंत केजकर यांनी श्री रागाने सुरुवात करत ..प्रभू के चरण कमल.. बंदीश सादर करून त्यानंतर ..चलो री माई ,रामसिया दर्शन को ..अतिशय सुरेख पद्धतीने आळवली. त्यानंतर समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या ..नमो गणपती ,माता सरस्वती.. गावो सितापती सर्वकाळ.. हे सुंदर वर्णन असलेले पद सादर करून त्यानंतर समर्थांचे आणखी ..एक राम सावळा सुंदर, कासे मिरवी पितांबर ..सादर केले.
प्रभू श्री रामचंद्राच्या करिता भक्ती कशी करावी याचे उदाहरण असलेली हनुमान भक्तीचे गीत.. नाम घेता मुखी राघवाचे ,दास हनुमंत नाचे ..सादर करून त्यानंतर जयंत केजकर यांनी.. जब जानकी नाथ सहाय रे ..अतिशय सुरेखपणे सादर केले .आपल्या ताना, आलापिंनी मंत्रमुग्ध करतानाच साथ संगत करणार्‍या प्रशांत पांडव यांनी तबल्यावर दिलेली त्यांना सुरेख दाद ही तितकीच सुरेख होती.

जयंत केजकर यांनी आपल्या या गायन सेवेची सांगता भजन ..रामचरण सुखदायी.. या सुंदर आलापी घेत भैरवीने केली .या गायन सेवेत पुणे येथील कुमार करंदीकर यांनी संवादिनी वर साथ केली, तर पखवाजवर सुहास गवळी साथीला होते. तानपुरा साथीला सागर जोशी आणि कीर्तनकार निहाल खांबेटे होते. या सर्व गायक वादक कलाकारांचा सत्कार गायन सेवेची सांगता झाल्यावर श्री समर्थ सेवा मंडळाचे वतीने ज्येष्ठ निरूपणकार प्रा .अजित कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन समर्थ भक्त योगेशबुवा रामदासी यांनी केले.

उद्या दि.5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता ह. भ. प. लक्ष्मीप्रसाद पटवारी, माजलगाव – बीड यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून सायंकाळी साडेसहा वाजता ठाणे येथील अमेय कारुळकर आणि डोंबिवली येथील श्रेयस व्यास यांचे सुश्राव्य गायन होणार आहे .


Back to top button
Don`t copy text!