विश्वासार्ह माहितीमुळे माहिती व जनसंपर्कच्या बातमीची दखल – विवेक गिरधारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑक्टोबर २०२१ | मुंबई | माहिती व जनसंपर्क विभागाची बातमी विश्वासार्ह असते, यासाठी माध्यमांकडून त्या बातमीची दखल घेतली जाते असे मत दै.पुढारीचे कार्यकारी संपादक विवेक गिरधारी यांनी व्यक्त केले.

कोकण विभागीय माहिती कार्यालयामार्फत आयोजित “शासकीय बातमी लेखन: वास्तव आणि अपेक्षाया विषयाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. माहिती व जनसंपर्क विभागाच्या कोकण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या यावेळी कोकण विभागीय उपसंचालक डॉ.गणेश मुळे, ठाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी अजय जाधव, पालघरचे प्र. जिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव, सहायक संचालक नंदकुमार वाघमारे यांच्यासह विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

श्री.गिरधारी म्हणाले की, उत्तम दर्जाच्या चांगल्या पुस्तकांचे, लेखकांचे वाचन केल्याने बातमीची गुणवत्ता आणि भाषेचा दर्जा उंचावतो. अचूक, स्वच्छ आणि शुध्द बातमी लेखनासाठी दैनंदिन वाचन आवश्यक आहे. शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांनी बातमी तयार करतांना बातमीचा आनंद घेतला पाहिजे. शासकीय यंत्रणेमार्फत जनतेला माहिती पुरविताना काही मर्यादा येतात. त्या चौकटीत राहूनच बातमीचे लेखन करणे आवश्यक आहे. आपल्या हातून बातमी चुकू नये, बातमीतून नकारात्मक संदेश जाऊ नये. अशी भिती शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या मनात सतत राहते. ही भिती न बाळगता बातमीचे लेखन करावे. बातमीची गुणवत्ता वाढविण्यासाठी शब्दसंग्रह आवश्यक आहे. त्यातून आपल्या बातमीची गुणवत्ता वाढते, असेही त्यांनी सांगितले.

प्रशिक्षणाच्या दुसऱ्या सत्रात ठाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी अजय जाधव यांनी शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या कशा लिहाव्यात याबद्दल मार्गदर्शन केले. प्रसिध्दी व प्रचार करतांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण कसे करावे याबाबत आपल्या अनुभवांची उदाहरणे देऊन आपल्याकडून बातमीच्या अनुषंगाने कोणती व कशा स्वरुपाची माहिती पुरविली जाणे आवश्यक आहे. वृत्तपत्रांसाठी नेमकी कशी बातमी हवी. आपण जे काम करतो ते अधिक चांगल्या पध्दतीने कसे होईल, याबद्दल त्यांनी माहिती दिली.

प्रशिक्षणाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माहिती सहायक प्रविण डोंगरदिवे यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!