दैनिक स्थैर्य | दि. २० जानेवारी २०२४ | फलटण |
विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी प्रेरित करणारी वेगवेगळी लक्षवेधी पुस्तके मुलांच्या डोळ्यांसमोर ठेवली पाहिजेत, तरच वाचन संस्कृती वाढेल. यासाठी शिक्षकांचे, पालकांचे योगदान फार मोलाचे आहे, अशा प्रकारचे विचार लेखिका सुलेखा शिंदे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त धुमाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व्यत केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या शोभा कांबळे होत्या. सुरूवातीला राजमाता जिजाऊ यांच्या पोवाडा श्रुती हुंबे या विद्यार्थिनीने गाऊन स्वागत केले. मुख्याध्यापिका स्मीता अडसूळ यांनी प्रास्ताविक केल्यानंतर सुलेखा शिंदे पुढे म्हणाल्या, ‘लेखकाचे घर पेरताना’ या पुस्तकाची निर्मिती करताना समाजकार्यातले विलक्षण अनुभव घेतले. माणसं वाचता आली म्हणूनच मी लेखिका झाले. विद्यार्थ्यांनी सुद्धा लेखक होण्यासाठी पुस्तकांबरोबरच माणसं वाचली पाहिजेत.
याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे यांनी आपली प्रकाशित पुस्तके शाळेला भेट देऊन ‘पुस्तकांच्या भिलार’ गावाप्रमाणे ‘फळांचे गाव’ म्हणून जमाळवाडी पुढे आली आहे. आता ज्ञानदानातही या गावांना नावलौकिक मिळवला पाहिजे, असे विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील भोसले, सत्वशीला फडतरे, पूजा कांबळे, रोहन कांबळे यांनी आपली मते मांडले. विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या मनोगतात राजमाता जिजाऊंच्या कार्याचे गुणगान केले. हेमा ठोंबरे यांनी आभार मानले.