दैनिक स्थैर्य । दि. १० मे २०२२ । कराड । महाराष्ट्रातील मीडियाचे असणारे प्रश्न शासनस्तरावर सोडवण्यासाठी महाराष्ट्र संपादक परिषद कार्यक्षमपणे काम करीत आहे. त्याचबरोबर प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे विविध प्रश्न आणि संपादक व पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न लवकरच शासन स्तरावर चर्चा करून मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाईल. असा ठराव महाराष्ट्र संपादक परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला.
महाराष्ट्र संपादक परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा तळबीड (ता. कराड) येथील यशराज सांस्कृतिक भवन येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी महाराष्ट्र संपादक परिषदेचे अध्यक्ष संजय मलमे, तळबीड येथील श्रीराम मंदिराचे ट्रस्टी व साईकिरण बाबा, कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे, कोषाध्यक्ष अनंत पाध्ये, शिवसेनेचे विभागप्रमुख, संस्थेचे उपाध्यक्ष गजानन चव्हाण, उपाध्यक्ष हेमंत सामंत, जगन्नाथ को ऑप सोसायटीचे चेअरमन राजेंद्र मोहिते, सचिव एकनाथ बिरवटकर, धोंडोपंत विष्णु पुरीकर, रमेश खोत, अमोल अंबेकर, आप्पासाहेब पाटील, गोरख तावरे, शंकर शिंदे, अरूण सुरडकर यांच्यासह कार्यकारणी सदस्य, सभासद उपस्थित होते.
विषय पत्रिकेचे वाचन सचिव एकनाथ बिरवटकर यांनी केले. त्याचबरोबर विषयपत्रिकेवरील चार विषय एकमताने सहमत करण्यात आले. मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करणे, नवीन सभासद होण्याबाबत विचार विनिमय करणे, गैरहजर राहणाऱ्या सभासदांनाबद्दल नोंद घेणे, अध्यक्षांच्या परवानगीने अन्य विषयांवर चर्चा व प्रस्ताव यांना वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.