स्थैर्य, फलटण, दि.२१: सातारा जिल्हा लोहार समाज संघटनेच्यावतीने जिल्ह्यातील अडचणीत आलेल्या लोहार समाज बांधवांना मदतीचा हात देऊन सहकार्य करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नमूद करीत याकामी संघटना पदाधिकारी सदस्यांची व्यक्तिगत मदत पुरेशी नसल्याने अन्य दानशूर व्यक्ती/संस्थांनी मदत करावी अशी अपेक्षा संघटनेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे.
लाॅकडाउन मुळे ज्या समाज बांधवांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे, काहींवर ऊपासमारीची वेळ आली आहे, उद्योग व्यवसाय बंद झालेला आहे अशा बांधवांचा शोध घेऊन त्यांना यथाशक्ती मदत करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना यथाशक्ती मदत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
आज अखेर जवळपास पंचवीस लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर प्रत्येकी एक हजार रुपये जमा करण्यात आले असून सदरची रक्कम जिल्हा कार्यकारिणी सदस्यानी स्वतः व काही दानशूर व्यक्तींच्या मदतीने वर्गणीच्या रुपाने गोळा केलेली आहे. यामध्ये सरकारी निधीचा समावेश नसल्याचे जिल्हाध्यक्षांनी आवर्जून सांगितले आहे.
या कार्यात सक्षम समाज बांधव व दानशूर व्यक्तींनी तन, मन, धनाने सहकार्य करावे अशी विनंती करतानाच अशा दानशूर लोहार समाज बांधवांचा संघटनेच्यावतीने योग्य वेळी यथोचित सत्कार करण्याची व्यवस्था करुन त्यांचे ऋण व्यक्त करण्याचे सूतोवाच करतांना त्याद्वारे अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी केलेली मदत निश्चितच प्रेरणादायी असणार असल्याचे सातारा जिल्हा लोहार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंतराव चव्हाण व त्यांचे सहकारी पदाधिकारी/कार्यकारिणी सदस्यांनी स्पष्ट केले आहे.