
दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२२ । सातारा । महागाई , बेरोजगारी ,शेतकरी आत्महत्या , ओला दुष्काळ ,चीनची घुसखोरी , पाकिस्तानच्या सीमेवरील कारवाया असे अनेक महत्त्वाचे प्रश्न आ वासून उभे आहेत अशा सर्व प्रश्नांवरील लोकांचे लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न गेल्या तीन-चार वर्षात चालू आहेत.अशातच प्रतापगड च्या पायथ्याशी अफजलखानाचा कोथळा काढलेले चित्र उभे करावे असा फतवा महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काढून बहुजन समाजात दुही माजवण्याचे काम सुरू केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी होते हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे यासंदर्भात खरी वस्तुस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखाना बरोबरच त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याची देखील खांडोळी केली आहे जर छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास दाखवायचा असेल तर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी चे शीर धडा वेगळे केलेले शिल्प ही उभारणे आवश्यक आहे. यासाठी या विचाराच्या सर्वांची एक बैठक मंगळवार दि २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी अकरा वाजता सर्किट हाऊस सातारा येथे आयोजित केल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील ,नरेंद्र पाटील, आप्पासाहेब उगले ,विकास जाधव ,राजेंद्र मोहिते , विजय मांडके यांनी दिली.
यासंदर्भात जिल्हाधिकारी सातारा यांनाही समक्ष भेटून मागण्यांचे निवेदन सादर केले जाणार आहे कोणत्याही परिस्थितीत धर्माधर्मात असलेले सलोख्याचे वातावरण बिघडू द्यायचे नाही असा निर्धार असल्याचे रघुनाथ दादा पाटील यांनी सांगितले.