
स्थैर्य, फलटण, दि. 11 ऑक्टोबर : आम आदमी पक्षाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील अंकुशराव लोखंडे यांच्यावर शुक्रवारी दुपारी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. फलटण विमानतळाजवळ तीन अज्ञात व्यक्तींनी लाकडी दांडक्याने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी फलटण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ही घटना शुक्रवारी, दि. १० ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. धैर्यशील लोखंडे हे फलटण विमानतळ येथून जात असताना, तीन अज्ञात व्यक्तींनी लाकडी दांडक्याच्या सहाय्याने दहशत निर्माण करत त्यांचा पाठलाग केला व त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. आपल्यावर हल्ला होणार असल्याचे लक्षात येताच, लोखंडे यांनी हल्लेखोरांना चुकवून तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली.
त्यानंतर पोलिसांच्या मदतीने हल्लेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी तिन्ही अज्ञात व्यक्तींविरोधात फलटण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असल्याची माहिती स्वतः धैर्यशील लोखंडे यांनी दिली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.