पेट्रोल दरवाढीमुळे फलटण तालुक्यात चक्क पेट्रोल लाईनमधुन पेट्रोल चोरीचा प्रयत्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. ०२ : मुंबई – पुणे – सोलापूरला जाणार्‍या पेट्रोल- डिझेल पाईप लाईन मधून पेट्रोल चोरीचा प्रयत्न करताना लाईन फुटल्याने फलटण तालुक्यातील झणझणे सासवड परिसरातील शेतं आणि विहिरी पेट्रोल डिझेलने भरून गेल्या आहेत. फलटण तालुक्यातील ज्या भागांमध्ये पाणी मिळणे ही एके काळी मुश्कील होते, त्या ठिकाणी पेट्रोल व डिझेल वाहू लागल्याने व विहिरीत पेट्रोल-डिझेलचा थर निर्माण झाल्याने चक्क पेट्रोल व डिझेलचे झरे तयार झालेले पहायला मिळाले. याबाबत कंपनीकडून लोणंद पोलीस स्टेशन मध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, मुंबई- पुणे -सोलापूर अशी एका कंपनीची उच्चदाब पेट्रोल पाईपलाईन जमिनीखालून सासवड (झणझणे) ता. फलटण गावच्या हद्दीतून गेली आहे. सासवड गावापासून दोन कि.मी अंतरावर खडकमाळ नावाच्या शिवारात पाईपलाईन मधून पेट्रोल मोठ्या प्रमाणात गळती होऊ लागल्याने संबधित कंपनीचे अधिकारी, लोणंद पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी घटनास्थळास भेट दिली. त्यावेळी चोरट्यांनी नियोजनबद्धरित्या पाईपलाईन फोडल्याचे निदर्शनास आले. शेतातील ऊसाच्या सर्‍या, ज्वारीचे वाफे यामध्ये लाखो लिटर पेट्रोल साठून राहिल्याने ज्वारी, मका, ऊस, गवत करपून गेले आहे. संबधीत कंपनीने टँकरद्वारे पेट्रोल भरून नेण्यात सुरूवात केली आहे.

घटनास्थळापासून 1 किमी परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी येण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला असून घटनास्थळी अग्नीशमक दलाची गाडी उभी करण्यात आली आहे. एका विहिरीतून पाणी मिश्रीत पेट्रोल टँकर भरण्याचे काम सुरू आहे. विहिरीत चार इंच पेट्रोलचा थर आल्याने परिसरात पाणी दुषित झाले आहे. त्यामुळे शेतकरी व जनावरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

तीन दिवसांपासून सुरु आहे गळती – सासवड परिसरात पेट्रोलची दुर्गधी येत असून शेतकर्‍यांमध्ये घबराट पसरली आहे. संबधित कंपनीने पेट्रोल पाईप लाईन तातडीने बंद केली. परंतु, पाईपलाईन मधील पेट्रोलची तीन दिवस गळती सुरू होती. हे पेट्रोल कंपनीने टँकरव्दारे भरून नेण्याचे काम दोन दिवसांपासून सुरु आहे. विहीरीत उतरलेले पेट्रोल टँकरमध्ये भरण्याचे काम आजही सुरू आहे. हजारो लिटर पेट्रोल वाया गेल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.


Back to top button
Don`t copy text!