दैनिक स्थैर्य | दि. ३० नोव्हेंबर २०२४ | फलटण |
कोळकी येथे पद्मावतीनगरमध्ये राहणार्या शुभांगी संजय शिंदे या ग्रामपंचायतीत ऑफिस क्लार्क म्हणून काम करणार्या महिलेने तिचे चुलत सासरे विठ्ठल शिंदे व चुलत दीर सुरेश शिंदे या दोघांनी मिळून खोटा सातबारा बनवून व जबरदस्तीने आपली शेतजमीन बळाविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. याबाबत शुभांगी शिंदे यांनी चुलत सासरे व दीर यांच्याविरोधात फलटण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले आहेत.
या प्रकरणाची शुभांगी शिंदे यांनी अर्जाद्वारे दिलेली माहिती अशी, शुभांगी शिंदे या कोळकीच्या पद्मावतीनगरमध्ये पती संजय जयसिंग शिंदे यांच्यासोबत राहत असून मागील ५ वर्षे ‘ऑफिस क्लार्क’ म्हणून कार्यरत आहेत. कोळकी येथे सर्वे नं. १३/३१/२ गणेशशेरी, गोविंद दूध डेअरीच्या पाठीमागे येथे ६२ गुंठ्यांच्या सामाईक सातबार्यात त्यांची शेतजमीन आहे. या शेतजमिनीच्या सातबार्यावर त्यांचे सासरे कै. जयसिंग सोपान शिंदे, विठ्ठल सोपान शिंदे, बुवासो सोपान शिंदे, राजेंद्र सोपान शिंदे व शिवाजी सोपान शिंदे अशा पाचजणांची नावे आहेत. शुभांगी शिंदे यांचे सासरे सध्या मयत असल्यामुळे त्यांचे वारस म्हणून पती संजय जयसिंग शिंदे यांचे नाव सातबारा उतार्यावर आहे; परंतु शुभांगी शिंदे यांचे चुलत सासरे चंद्रकांत मारुती शिंदे यांचा मुलगा चुलत दीर सुरेश (बंडू) चंद्रकांत शिंदे व चुलत सासरे विठ्ठल सोपान शिंदे या दोघांनी मिळून बनावट (खोटा) सातबारा दि. ०९/०२/२०२२ रोजी बनवून ही जमीन बळाविण्याचा प्रयत्न केल्याचे शुभांगी शिंदे यांनी म्हटले आहे.
बनावट सातबारा बनविताना चुलत सासरे व दीर यांना तहसील रेकॉर्ड ऑफिसचे लिपिक गोपी जगताप या व्यक्तीने मदत केल्याचे त्यांनी म्हटले आहे. गोपी जगताप या व्यक्तीचा कोळकी गावाच्या रेकॉर्डशी काहीएक संबंध नसताना त्यांनी रेकॉर्डमध्ये हस्तक्षेप केला व बनावट (खोटा) सातबारा ऑनलाईन करण्यासाठी तलाठी ऑफिसला दिला; परंतु शुभांगी शिंदे यांनी वेळोवेळी तलाठी, तहसीलदार, मंडल अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करत हा बनावट सातबारा उघडकीस आणला आहे.
चुलत दीर व सासर्यांनी लबाडी केली असतानाही फत आपली माणसे समजून माझ्या पतींनी याबाबत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला नाही. मात्र, पुन्हा माझे चुलत सासरे विठ्ठल शिंदे व दीर राजेंद्र शिंदे यांनी २९/०४/२०२४ रोजी आम्हा पती-पत्नीवर दिवाणी न्यायालयात चुकीच्या पद्धतीने केस दाखल केली, असे शुभांगी शिंदे यांनी म्हटले आहे.
सातबार्यामध्ये आमचे नाव असूनसुद्धा आम्हाला वहिवाटीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. केवळ दमदाटी, गावपुढार्यांचा दबाव, शिवीगाळ करून आम्हाला शेतजमिनीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तसेच आम्हाला धमकावत आमच्या शेतजमिनीचे तार कंम्पाउंड तोडले, सगळ्या साहित्याची तोडफोड केली. आमचे सुमारे ५० हजारांचे आर्थिक नुकसान केले व आमच्या शेतीत दि. २६/११/२०२४ रोजी अतिक्रमण केले, असेही शिंदे यांनी अर्जात नमूद केले आहे.
याविरोधात शुभांगी शिंदे व त्यांचे पती यांनी चुलत दीर व सासर्यांविरोधात शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, तरीही चुलत सासरे व दीर यांनी धमकावणे, शिवीगाळ करणे, मानसिक त्रास देऊन शेतजमीन बळकाविण्याचा प्रयत्न चालू ठेवल्याचे शुभांगी शिंदे यांनी म्हटले आहे.
विठ्ठल सोपान शिंदे, राजेंद्र सोपान शिंदे व व सुरेश चंद्रकांत शिंदे या तिघांनी मिळून मला व माझे पती संजय जयसिंग शिंदे यांना प्रचंड मानसिक त्रास दिला आहे, असा आरोपही शुभांगी शिंदे यांनी अर्जात केला आहे.