दैनिक स्थैर्य । दि. ३ जुलै २०२१ । खंडाळा । विवाहित युवकाबरोबर विवाहास नकार देणार्या युवतीला मारहाण करत कारमधून अपहरण करणार्या जालना जिल्ह्यातील दोन युवकांना शिरवळ पोलीसांनी शिताफीने अटक केली आहे. पोलीसांनी तुषार भारतसिंग परदेशी (वय 28) व आशिष परमेश्वर काळबांडे (वय 22) या दोन अपहरणकर्त्यांना अटक केली असून कारही ताब्यात घेतली आहे.
याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, जालना जिल्ह्यातील संबंधित युवतीचे पूर्वी 8 वर्षांपूर्वी जालना जिल्ह्यातील तुषार परदेशी या युवकाबरोबर प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, युवतीबरोबर लग्न करण्यास नकार दिल्याने तुषार परदेशी याच्याबरोबरचे प्रेमसंबंध युवतीने तोडून टाकले होते. तुषारने संबंध तुटल्यानंतर पुन्हा युवतीला लग्नाची मागणी घातल्यानंतर युवतीने लग्न करण्यास नकार दिला होता. यावेळी तुषारने दुसर्या मुलीबरोबर लग्न केले होते. त्यानंतर तुषार परदेशी हा जानेवारी 2021 पासून सतत दूरध्वनीद्वारे त्रास देत होता.
दरम्यान, शुक्रवार दि. 2 जुलै रोजी सबंधित युवती नेहमीप्रमाणे कंपनीमध्ये कामावर जाणेकरीता शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या एका पतसंस्थेसमोर युवती आली असता कार (क्र. एमएच 43 – एबी-2349) मधून आलेल्या तुषार परदेशी व कारचालक आशिष परमेश्वर काळबांडे हे त्याठिकाणी आले. यावेळी कारमधून तुषार परदेशी हा उतरल्यानंतर युवती महामार्गाच्या दिशेने पळू लागली असता तुषार परदेशी याने युवतीचा पाठलाग करीत युवतीला कारमध्ये जबरदस्तीने बसवण्याचा प्रयत्न केला. युवतीने प्रतिकार केला असता तुषार परदेशी याने युवतीला मारहाण करीत जबरदस्तीने कारच्या पाठीमागील सिटवर बसवीत कार सातारा बाजूकडे महामार्गावरून पळविली.
यावेळी याबाबतची घटनास्थळावरून माहिती तत्काळ शिरवळ पोलीस स्टेशनला मिळताच शिरवळ पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू अहिरराव, पोलीस हवालदार किशोर नलावडे, प्रशांत वाघमारे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, युवतीचा आरडाओरडा ऐकून सातारा बाजुकडून पुणे बाजूकडे निघालेल्या दुचाकीवरील एका जोडप्याने कारचा पाठलाग करत कारला दुचाकी आडवी मारली. त्यामुळे संबंधितांनी कार थांबवली.
यावेळी शिरवळ पोलिसांनी व उपस्थित नागरिकांनी घटनास्थळावरून पलायन करणार्या तुषार परदेशी व चालक आशिष काळबांडे याच्या कारसह अवघ्या 10 मिनिटांमध्ये मुसक्या आवळत युवतीची सुटका केली.
या घटनेची विनयभंग व अपहरणची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई ह्या करीत आहे.