काळोशी येथे एलसीबीची कारवाई : दुचाकी, चार चाकी हस्तगत
स्थैर्य, सातारा, दि. 9 : जामीन मिळवून देणार्या वकिलाचीच कार पैसे आणण्याच्या बहाण्याने पळवून नेणार्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काळोशी, ता. सातारा येथे जेरबंद केले. त्याच्याकडून दुचाकी आणि चार चाकी असा 95 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेला काळोशी- कोडोली गावाकडे जाणार्या रोडच्या कडेला चोरीची एक चार चाकी आणि एक मोटार सायकल संशयीतरीत्या उभी असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्याअनुषंगाने सपोनि आनंदसिंग साबळे यांच्या पोलीस पथकाने काळोशी येथे जावून त्याठिकाणी सापळा रचला. यावेळी संशयित मोटार सायकलच्याजवळ आला. तो मोटार सायकल घेवून जाण्याच्या तयारीत होता त्याचवेळी त्यावेळी पोलीस पथकाने त्यास शिताफीने ताब्यात घेतले. संशयीताने मोटारसायकल (एमएच 11 सीसी 8016) व कार (एमएच 01 व्ही 4514) चोरली असल्याचे सांगितले. त्याची कसून चौकशी केली असता उंब्रज पोलीस स्टेशनला एका गुन्ह्यात खोटे नाव सांगून वकिलाकरवी जामीन केला व त्याच वकिलांची गाडी पैसे घेवून येतो असे सांगुन चोरून नेल्याची कबुलीही त्याने दिली. त्याबाबतही सातारा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. संशयीतांकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकल व मारुती कार असा एकुण 95 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संशयीत हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सातारा, कोल्हापुर, सांगली, शिर्डी, राहुरी, बारामती येथे मोटार सायकल व चार चाकी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील यांनी दिलेल्या सूचनानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरिक्षक आनंदसिंग साबळे, सहा.फौजदार ज्योतीराम बर्गे, हवालदार सुधीर बनकर, विनोद गायकवाड, पो.ना. संतोष जाधव, मोहन नाचण, गणेश कापरे, वैभव सावंत, धीरज महाडीक यांनी सहभाग घेतला होता.