दैनिक स्थैर्य । दि. ०६ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा शहरातील बदामी विहिरीजवळ एका युवकावर तलवार, कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी सहाजणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. संग्राम उर्फ लल्या भंडारे, तेजस मांढरे, नरु मांढरे, आदित्य गोसावी, यश जांभळे, धनू मांढरे अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे असून यापैकी पाचजणांना अटक झाली आहे. दरम्यान, या हल्ल्यात शुभम जखमी झाला असून त्याच्यावर कोणत्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत, याची माहिती मिळालेली नाहीत.
याबाबत शाहूपुरी पोलिसांकडून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, शुभम नारायण पवार (वय २0, रा. मंगळवार पेठ, सातारा) या युवकाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याच्या बहिणीची छेड संग्राम उर्फ लल्या भंडारे (रा. ५0१, मंगळवार पेठ, सातारा) याने काढली होती. या घटनेनंतर शुभम आणि संग्राम या दोघांच्यात भांडणे झाली होती. दरम्यान, शुभम हा त्याच्या बहिणीला घेवून डॉ. सदावर्ते यांच्या दवाखान्यात गेला होता. यावेळे तो दवाखान्याच्या बाहेर एका नंबर नसलेल्या दुचाकीवर बसून भाऊ ओमकार नलवडे याच्या सोबत मोबाईलवर बोलत होता. याचवेळी संग्राम उर्फ लल्या भंडारे, तेजस मांढरे (रा. चिमणपूरा पेठ, सातारा), नरु मांढरे (रा. चिमणपूरा पेठ, सातारा), आदित्य गोसावी (रा. शुक्रवार पेठ, सातारा), यश जांभळे (रा. शाहूपुरी, सातारा), धनू मांढरे (रा. चिमणपूरा पेठ, सातारा) हे सहाजण तेथे आले. येथे आल्यानंतर ज्या गाडीवर शुभम बसला होता, त्या गाडीचा हँडल संग्राम याने धरला आणि ‘तेजस, तू याला जीवंत सोडू नकोस. तुझ्या हातातील कोयता याच्या डोक्यात घाल, असे म्हटला. यानंतर तेजस याने शुभम याच्या मानेवर कोयत्याने वार केला तर नरु याने हातात असलेल्या तलवारीने शुभमवर हल्ला केला. हा वार शुभम याने चुकवला. मात्र, तलवार त्याच्या डोक्यात लागली. यावेळी शुभम खाली पडला. यानंतरही संशयितांकडून शुभमवर हल्ला सुरुच होता. शुभम खाली पडल्यानंतर आदित्य, यश जांभळे, धनू मांढरे या तिघांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, ही मारहाण सुरु असतानाच संग्राम याने शुभम याला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. याचवेळी ‘याला जीवंत सोडू नका, याला मारुन टाका,’ असे म्हणत तेजस याने शुभमच्या मानेवर कोयत्याने वार केला. या प्राणघातक हल्ल्यात शुभम जखमी झाला आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी पाचजणांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बशीर मुल्ला करत आहेत.