ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ला अतिशय निंदनीय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०९ एप्रिल २०२२ । मुंबई । राज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी पावले उचलत आहे. मुंबई उच्च न्यायालयाला शासनाने काय काय निर्णय घेतले आहेत त्याची व्यवस्थित माहिती दिली आहे. न्यायालयदेखील या सर्व प्रकरणी लक्ष ठेवून असून यासंदर्भातील निर्णयदेखील त्यांनी दिला आहे, मात्र आज ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या घरावर झालेल्या या अचानक हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय असून याला जबाबदार असणाऱ्यांवर तसेच हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

नेत्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या घरांवर हल्ले करणे हा पायंडा महाराष्ट्राने कधीही पाडलेला नाही असेही ते म्हणतात.

मुख्यमंत्री आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात की, एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसंदर्भात आंदोलन करीत असले तरी राज्य शासनाने कधीही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले नाही. महामंडळाचा कर्मचारी आमचाच आहे या भावनेतून जितके जास्तीत जास्त आर्थिक व सेवाविषयक लाभ देता येतील ते आम्ही दिले. मुंबई उच्च न्यायालयात याविषयीची माहिती वेळोवेळी सादर केली. न्यायालयानेसुद्धा त्याची नोंद घेत एसटीच्या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यास सांगितले. कर्मचाऱ्यांनीदेखील याचे स्वागत केल्याच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचत असतानाच अचानक आज दुपारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी एक जमाव पोहोचून घोषणाबाजी करतो व दगडफेक, चप्पलफेक करतो ही कृती अतिशय अनुचित व कुणालाही न पटणारी आहे. अशा प्रकारे हिंसेला उद्युक्त किंवा प्रक्षोभ निर्माण करणाऱ्यांवर तसेच चिथावणी देणाऱ्यांवर कायद्याने कडक कारवाई झाली पाहिजे अशा सूचना मी गृहमंत्र्यांना दिल्या आहेत असेही मुख्यमंत्री म्हणतात.

या निंदनीय घटनेला प्रत्युत्तर म्हणून कुणीही कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहोचेल असे कृत्य करू नये. एसटी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या भल्यासाठी नेहमीच शासन त्यांच्याबरोबर राहील मात्र या कर्मचाऱ्यांच्या संसाराच्या राखेवर कुणी आपल्या पोळ्या भाजू नयेत असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे


Back to top button
Don`t copy text!