कर वसुलीला गेलेल्या नगरपरिषद पथकावर फलटणमध्ये हल्ला! नळ कनेक्शन तोडताना शिवीगाळ करत कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात; सरकारी कामात अडथळा


मार्च अखेरनिमित्त फलटण नगरपरिषदेकडून घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची मोहीम सुरू असताना काही नागरिकांकडून कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. पद्मावती नगर येथे वसुलीस गेलेल्या पथकावर हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 3 मार्च : मार्च महिना सुरू असल्याने फलटण नगरपरिषदेने सध्या घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची मोहीम अत्यंत तीव्र केली आहे. शहराच्या विकासासाठी आणि नागरी सुविधांसाठी कर भरणे आवश्यक असताना, काही नागरिक मात्र कर भरण्याऐवजी मुद्दामून नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्याचे आणि हुज्जत घालत असल्याचे गंभीर प्रकार समोर येऊ लागले आहेत. पद्मावती नगर येथे कर वसुलीसाठी गेलेल्या नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून एका कर्मचाऱ्याच्या थेट कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला आहे.

याप्रकरणी संबंधित नागरिकांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका प्रकार काय घडला?

नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, रविवारी (दि. ०१ मार्च २०२६) सकाळी पावणे बाराच्या सुमारास नगरपरिषदेचे कर अधिकारी, वसुली लिपिक आणि शिपायांचे एक पथक पद्मावती नगर येथे कर वसुलीसाठी गेले होते. एका थकबाकीदार महिलेची घरपट्टी अनेक वर्षांपासून थकीत असल्याने पथकाने त्यांना कराचा भरणा करण्यास सांगितले. त्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

नळ कनेक्शन तोडताना अंगावर धावून गेले

संबंधित नागरिक थकीत बिल भरत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, नगरपालिकेच्या पथकातील एका कर्मचाऱ्याने त्यांचे नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू केली. या कारवाईचा राग आल्याने संबंधित महिला आणि घरातील एका तरुणाने कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून जात “अरे कुत्र्या, नळ कनेक्शन तोडू नको,” अशी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ व दमदाटी केली.

व्हिडिओ काढणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मारली चापट

नागरिकांकडून सुरू असलेला हा धिंगाणा आणि हुज्जत पथकातील एक शिपाई आपल्या मोबाईलमध्ये चित्रित (व्हिडिओ शूटिंग) करत होता. हे पाहताच संबंधित महिलेने थेट त्या शिपायाच्या अंगावर धावून जाऊन त्याच्या गालावर जोरात चापट मारली आणि त्याच्या हातातील मोबाईल खाली पाडला.

सरकारी कामात अडथळा; पोलिसांत गुन्हा दाखल

“तुम्ही इथून चालते व्हा,” असे म्हणत या नागरिकांनी सरकारी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत त्यांच्या सरकारी कामात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला. या भयंकर घटनेची माहिती मुख्याधिकाऱ्यांना दिल्यानंतर, त्यांच्या लेखी आदेशानुसार या पथकातील कर अधिकाऱ्यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

पोलिसांनी याप्रकरणी संबंधित महिला व तरुणाविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार अश्विनी चव्हाण या करत आहेत.

कर वसुलीसारखे अत्यंत महत्त्वाचे कर्तव्य बजावत असताना नागरिकांकडून अशा प्रकारे मारहाण आणि दमदाटी होत असल्याने नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.


Back to top button
Don`t copy text!