रेवडी येथील विवाहितेला मारहाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२४ जानेवारी २०२२ । मुंबई । कोरेगाव तालुक्यातील रेवडी येथील एका विवाहितेला उपाशीपोटी ठेवून मारहाण करत तिला शारिरीक, मानसिक त्रास दिल्याप्रकरणी सहाजणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सासू सुरेखा पांडूरंग आवारे, सासरा पांडूरंग ज्ञानदेव आवारे, पती प्रतिक आवारे, दीर मनोज लक्ष्मण आवारे, नीता मनोज आवारे (सर्व रा. रेवडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) आणि नणंद कोमल रुपेश बेडेकर (रा. पनवेल, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. रात्री उशिरापर्यंत यापैकी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.

दरम्यान, हा संपूर्ण प्रकार दि. २७ नोव्हेंबर २0२0 ते दि. २८ ऑगस्ट २0२१ या कालावधीत घडला असला असून याची तक्रार शनिवार, दि. २२ रोजी दाखल झाली आहे. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, विशाखा प्रतिक आवारे (वय २१, रा. रेवडी, ता. कोरेगाव, जि. सातारा. सध्या रा. वडूथ, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘तुझ्या वडिलांनी अजून दागिने घालायला घालून थाटात लग्न करुन द्यायला पाहिजे होते,’ असे बोलून नणंद कोमल रुपेश बडेकर (रा. पनवेल, मुंबई) हिने वारंवार भांडण काढली आणि मानसिक त्रास दिला. सासरा पांडूरंग याने वडिलांकडून पैसे घेवून येण्यास तगादा लावला. मात्र, विशाखा यांनी नकार दिल्यामुळे दारु पिवून वारंवार त्रास देत होता. सासू सुरेखा मानसिक त्रास देत होती तर दीर मनोज हा कारण नसताना मानसिक त्रास देत होता.

दरम्यान, पती प्रतिक याच्या प्रेमसंबंधाच्या अनुषंगाने विचारणा केली असता ‘तुला काय करायचे आहे,’ असे बोलून विशाखा यांना मारहाण केली. याप्रकरणी विशाखा यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या सहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशिरापर्यंत यापैकी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.


Back to top button
Don`t copy text!