मार्निंग वॉकला चाललेल्या मुलींवर सातारा जिल्ह्यात हल्ला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, उंडाळे, दि.५: मार्निंग वॉकला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर अनोळखी दुचाकीस्वाराने धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात एक मुलगी जखमी झाली. हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तुळसण (ता. कऱ्हाड) येथे ही घटना नुकतीच घडली. या प्रकाराने परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

संबंधित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सांगितले, की तुळसण येथील दोन मुली सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेल्या. या दोन्ही मुली अल्पवयीन आहेत. त्यातील एक 16 वर्षांची, तर तिची लहान बहीण 12 वर्षांची आहे. दोघी बहिणी पहाटे पाच वाजता तुळसणकडून कोळेवाडी खिंडीकडे मॉर्निंग वॉकला निघाल्या होत्या. त्या वेळी गावापासून निर्मनुष्य रस्त्यावर तुळसणकडून दुचाकीवरून भरधाव आलेल्या व्यक्तीने मागून त्या दोन्ही मुलींवर धारदार शस्त्राने हल्ला केला.

त्यात 16 वर्षांच्या मुलीच्या हाताला दुखापत झाली. तिला तातडीने उपचारासाठी कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तिची प्रकृती स्थिर आहे. घटनेनंतर हल्लेखोर कोळेवाडीच्या दिशेने भरधाव वेगाने पसार झाला. घटनेच्या वेळी तेथे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या अन्य ग्रामस्थांनी संबंधिताला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नाही. या घटनेची नोंद कऱ्हाड तालुका पोलिसांत झाली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!