दैनिक स्थैर्य । दि.१३ फेब्रुवारी २०२१ । सातारा । सातारा शहरातील मंगळवार पेठेत असणाऱ्या जागेत खोदकाम करत जमिनीचे नुकसान केल्याप्रकरणी शाहुपूरी पोलिस ठाण्यात सातारा पालिकेचे नगरसेवक रविंद्र निवृत्ती ढोणे (वय ४३, रा. रामाचा गोट, सातारा) यांच्यासह तीन जणांवर अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (ॲट्रासिटीतंर्गत) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रविंद्र ढोणे हे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीचे नगरसेवक आहेत.
सातारा शहरातील मंगळवार पेठेत विक्रांत बाळकृष्ण दुबळे हे राहण्यास असून त्यांची त्याच परिसरात वडिलोपार्जित जागा आहे. ता. ४ रोजी विक्रांत दुबळे हे कामावर गेले होते. याचदरम्यान, त्यांना आईने फोन करत आपल्या जागेतून गटार खोदण्यात येत असून तु घरी ये, असा निरोप दिला. यानुसार ते घरी गेले असता, त्यांना त्याठिकाणी नगरसेवक रविंद्र ढोणे व इतर नागरीक थांबलेले दिसले.
याठिकाणी चर्चेवेळी दुबळे यांनी सदर जागा आमची वडिलोपार्जित असल्याचे त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या ढोणे आणि इतरांना सांगितले. याचवेळी त्याठिकाणी असणाऱ्या संभाजी वायदंडे, पुष्पा संभाजी वायदंडे यांनी ती जागा स्वत:ची असल्याचा दावा करत वाद घालत दमदाटी केली. याबाबतची अदखलपात्र तक्रार त्यांनी त्याच दिवशी शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंदवली होती. ता. ११ रोजी दुपारी विक्रांत दुबळे हे कामावरुन घरी जेवण करण्यासाठी आले होते.
यावेळी त्यांना वडिलोपार्जित जागेत खुदाई केल्याचे तसेच त्याठिकाणी संभाजी वायदंडे, पुष्पा वायदंडे, रविंद्र ढोणे हे उभे असल्याचे दिसले. वडिलोपार्जित जागेत खुदाई करत जमिनीचे नुकसान केल्याची तक्रार काल (शुक्रवारी) विक्रांत दुबळे यांनी शाहुपूरी पोलिस ठाण्यात नोंदवली. यात त्यांनी संभाजी वायदंडे, पुष्पा वायदंडे यांच्याशी संगनमत करत नगरसेवक रविंद्र ढोणे यांनी मी मागासवर्गीय असल्याचे माहित असूनही माझ्या मालकीच्या मोकळ्या जागेत खुदाई करत नुकसान केल्याचे नमुद केले आहे. यानुसार रविंद्र ढोणे, संभजी वायदंडे, पुष्पा वायदंडे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास अतिरिक्त पोलिस अधीक्षक आंचल दलाल या करीत आहेत.