स्थैर्य, कोरेगाव, दि. 13 : कोरेगाव तालुक्यातील उच्च शिक्षित असणार्या युवतीवर वेळोवेळी बलात्कार करून गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात केल्याप्रकरणी संग्राम महादेव घाडगे (वय 25, रा. समता पार्क, शाहूपुरी) याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयिताने फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली आहेे. या प्रकरणात तीन महिला व आणखी एका पुरुषाला सहआरोपी करण्यात आले आहे. दरम्यान, संशयित आरोपीने महाबळेश्वरमधील हॉटेल मलबेरीसह ठिकठिकाणी युवतीवर बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
महादेव लक्ष्मण घाडगे (रा. समता पार्क) असे या प्रकरणातील दुसऱ्या पुरुषाचे नाव असून त्याच्यासोबत इतर तीन महिलांचा सहआरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, अत्याचाराची घटना 2018 पासून वेळोवेळी घडलेली आहे. तक्रारदार युवती 25 वर्षीय आहे. ही युवती व संशयित आरोपी संग्राम घाडगे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. संग्राम याने साताऱ्यातील केबीपी कॉलेज, सदर बझार परिसरात युवतीला जबरदस्तीने कारमध्ये ओढून तिचे फोटो काढले. ती स्वीफ्ट कार संशयित आरोपीची असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. फोटो काढल्यानंतर तेच फोटो व्हायरल करेन, अशी धमकी देत समता पार्क येथील घरी नेवून त्या युवतीवर बलात्कार केला.
या घटनेनंतर युवती घाबरुन गेली. संशयित संग्राम याने फोटो व व्हिडीओ काढून त्याद्वारे ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. फोटो, व्हिडीओ असल्याने युवती अधिकच घाबरुन गेली. पुढे त्या आधारावर संशयित आरोपी संग्रामने युवतीला महाबळेश्वर येथील मलबेरी हॉटेलमध्ये येण्यास बजावले. युवतीने नकार देताच त्याने फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. संशयिताने वेळोवेळी मारहाण देखील केली. दरम्यान, बलात्कार, मारहाण, ब्लॅकमेल सुरु राहिल्याने युवतीला नैराश्य आले. त्यातच ती युवती गर्भवती राहिली. ही माहिती संग्राम याला समजल्यानंतर त्याने युवतीला गोळ्या देवून गर्भपात केला. या घटनेने युवतीला आणखी मानसिक धक्का बसला.
अत्याचार वारंवार होत असताना संशयित आरोपीशी संबंधित असणार्या इतर 4 संशयित आरोपींनी देखील संशयित संग्राम घाडगे याला या प्रकरणात वेळोवेळी मदत केली. संशयित महिलांनी देखील ‘संग्राम सोबत महाबळेश्वर येथे जा नाही तर तुझ्या बदनामीचे फोटो व्हायरल करेन,’ अशी दमदाटी करत घरच्यांनाही जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अशाप्रकारे इतर संशयित चौघांनी प्रत्येक कृत्यात संग्राम याला मदत केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
युवतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी तातडीने मुख्य संशयित आरोपी संग्राम घाडगे याला ताब्यात घेवून अटक केली. शनिवारी अटक करुन रविवारी न्यायालयात त्याला हजर केले असता 18 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, संशयित पाच आरोपींपैकी एक महिला संशयित आरोपी डॉक्टर असल्याचे समोर येत आहे. यामुळे हे प्रकरण हायप्रोफाईल बनले आहे. गर्भवती असलेल्या युवतीला दिलेल्या गोळ्या कुठून आणल्या? गोळ्या घेतलेल्याची नोंद ठेवली गेली आहे का? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहे.
अत्याचार वारंवार वाढू लागल्याने अखेर युवतीने पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरुध्द गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास सपोनि माने करत आहेत.