दैनिक स्थैर्य । दि. २७ नोव्हेंबर २०२२ । आटपाडी । आजच्या काळामध्ये सर्व प्रमुख कारागृहे ही एक गुन्हेगारांची विद्यापीठे बनली आहेत, असे आजचे वास्तव आहे आणि इथे गेल्यानंतर छोट्यात छोटा गुन्हेगार व कच्चा कैदी सुद्धा गंभीर गुन्हे करणारांच्या संपर्कात येतो आणि बिघडतो . हे उघडकीस आलेल्या अनेक गुन्ह्यातून आता स्पष्ट होवू लागले आहे . यावरचा एक उपाय औंध संस्थानच्या दुरदृष्टीच्या राज्यकर्त्यांनी फार पूर्वी शोधला आणि आटपाडी जि. सांगली येथे स्वतंत्रपुर ही खुली बंदिशाळा उभी केली . गेली ८३ वर्षे हे खुले जेल सुरू आहे . ते कसे आहे याची झलक चित्रतपस्वी व्ही . शांताराम यांच्या *”दो आँखे बारह हाथ “* या चित्रपटात पहायला मिळते . आजही आटपाडीत जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले अनेक कैदी सहकुटूंब रहात आहेत . शिक्षेसह जीवन सुंदर जगण्याचा एक महान मार्ग आज ही सुरु आहे . त्याविषयीचा हा लेखन प्रपंच.
आटपाडी गावापासून ३ किलो मीटर अंतरावर पश्चिमेला स्वतंत्रपुर नावाची कैद्यांसाठी मुक्त वसाहत आहे . खुन करून जन्मठेपेची सजा भोगणारे काही कैदी इथे आणून ठेवतात . त्यांच्या हाता पायात बेड्या नसतात . येथील शासकीय जमिनीत कैद्यांनी शेती करावी . अन्नधान्य व इतर पिके घेऊन येणाऱ्या उत्पन्नातून आपला चरितार्थ चालवावा . त्यांनी इथे सहकुटूंब रहावे . म्हणजे इथे आपण कैदी आहोत, या जाणिवेचा त्यांना विसर पडेल . हा तुरुंग न होता हे संस्कार – केंद्र किंवा मानवतेचे शिक्षण देणारे विद्यालय बनावे . ही या मागची मुलभुत कल्पना आहे . शिक्षा संपवून परतणारा कैदी सन्मानाने जगावा, तो ‘गृहस्थ ‘ व्हावा, असा एक दृष्टीकोन आहे . स्वातंत्र्योत्तर काळात विकास – लक्ष्मीची पाऊले अनेक माळरानावर उमटली . त्यातून गावच्या विकासाच्या भाग्योदयाचे तांबडे फुटले . पण या पहाटेची किरणे स्वतंत्रपुरापर्यंत पोहचलीच नाहीत . कैद्यांना माणूस बनविणाऱ्या या आगळ्या वेगळ्या प्रयोगाने राज्यासह देशाला भुरळ पाडली आहे .
एका प्रचंड विहीरीच्या काठी उभा असलेला एक महाकाय वटवृक्ष . पाण्यात पाय सोडून बसलेल्या बालकवींच्या औदुंबराने नंतरच्या साहित्य रसिकांना काव्यानंद दिला आणि या स्वतंत्रपुरच्या वटवृक्षाने अनेक पांथस्थांना निर्वेध सावली दिली . प्रेमाचा आधार दिला . खुन करून दीर्घ सजा भाळी आलेल्या कैद्यांची मुक्त वसाहत असलेल्या इथल्या बंदिवानांना काझी मास्तरांनीही असाच आधार दिला . प्रेमाची सावली दिली .
उघड्या रानात, निसर्गाच्या हिरव्या सानिध्यात गेली ८३ वर्षे हा प्रयोग चालु आहे . ही वसाहत प्रेमाची आश्वासक हाक देत हसतमुखाने उभी आहे . ९८ वर्षाचे आयुष्य लाभलेल्या काझी मास्तरांची तरुण पणापासूनची मोठी उमर स्वतंत्रपुरासाठीच खर्ची पडली . खादीचा लांबसा अंगरखा, खादीची टोपी आणि त्यावर खादीचेच जाकीट असा काझी मास्तरांचा स्वतंत्रपुरातला पेहराव . त्यांचे संपूर्ण नाव अब्दुलअजिज अब्दुलखालीक काझी . इथल्या जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यावर देखरेख करण्याचे काम अनेक वर्षे काझी मास्तरांनी केले . खरे तर ते जेलर . जेलर म्हणूनच त्यांना संबोधले जायला हवे होते . पण ग्रामस्थांनी आणि कैद्यांनी त्यांना मास्तराचा किताब बहाल केला . ते मास्तर आणि कैदी त्यांचे विद्यार्थी . ज्याच्या हातून खून झाला आहे असेच कैदी येथे येतात . त्यांचे हात सतत विधायक निर्मितीत गुंतलेले आणि पाय नांगर ओढताना शेतातल्या मातीने रापलेले . या कैद्यांच्या मनातील हिंस्त्र वृत्ती नाहीशी करून त्यांच्या मनात करूणा – दया जागविणे . प्रेम वात्सल्याच्या भावना त्यांच्या मनात निर्माण करणे हा स्वतंत्रपूर येथे त्यांना ठेवण्यातला मुळ हेतू . अर्थात हा प्रयोगच . प्रयोग अनेकदा फसतात . पण काझी मास्तरांची शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यापासून कैद्यानींही या प्रयोगाच्या यशाला हातभार लावला आहे . तसे पाहीले तर हे काम महा कर्मकठीण . मुक्त असलं म्हणजे काय झालं ? शेवटी ते कैदीच ना ! इथे कष्ट केल्याशिवाय अन्न मिळणार नाही . ही कल्पना सर्वच कैद्यांना रुचेल असे नाही . त्यापेक्षा पळून जावे . आपल्या बायको मुलांमध्ये पुन्हा रमावे . ही भावना कैद्यांच्या मनात उमटली तर त्यात सकृतदर्शनी तरी काही गैर नाही . पण कैद्याना सुधारण्याची, त्यांना माणूस बनविण्याची जोखीम, काझी मास्तरांनी घेतली . आणि त्यांच्याशी दगाबाजी करण्याची दुर्बुद्धी मास्तरांच्या सेवाकाळात एकाही कैद्याच्या मनात आली नाही . ही मास्तरांनी कैद्यांच्या वर टाकलेल्या विश्वासाची पावती नव्हे का ? दिल्लीला तत्कालीन पोलीस महानिरीक्षक किरण बेदी यांनी तुरुंगातील कैद्यांना मानवतेच्या भूमिकेतून वागवून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणल्या बद्दल त्या मॅगसेसे पुरस्काराने सन्मानीत झाल्या . मात्र स्वतंत्रपुर वसाहतीकडे सर्व जगाने दुर्लक्ष केले . इथल्या कार्याची उपेक्षा झाली . याचा खेद आणि दु : खाने मन भरून आले . ८३ वर्षे सुरु असलेल्या या मानवता कार्याचे दर्शन व परिचय इतरे जणांना अद्याप झालेच नाही.
स्वातंत्र्याची चळवळ ऐन भरात आली होती . महात्मा गांधीनी आपल्या स्वातंत्र्य चळवळीच्या कार्यास जोडून तरुणांनी अनेक प्रकारची सेवा कार्ये करण्याचे आवाहन केले होते . त्यामध्ये, मानव हा जन्मतः गुन्हेगार नसतो . परिस्थिती त्याला गुन्हेगार बनविते . अहिंसा व मानवतेच्या दृष्टीकोनातून कैद्यांना वागविले पाहीजे. त्यांची सेवा करण्याचे बापूंनी आवाहन केले होते . त्यावेळी स्वतंत्रपुरासह आटपाडीचा सर्व परिसर हा औंध संस्थानचा भाग होता . संस्थानला विद्याप्रेमी – कलेची उपासना करणारा, विदवान व समाज सेवकांना आश्रय देणारा राजा लाभला होता . कै बाळासाहेब उर्फ भवानराव पंत – प्रतिनिधी आणि त्यांचे उच्चशिक्षित सुपुत्र कै . बॅ . आप्पासाहेब पंत – प्रतिनिधी, हे दोघे विचाराने पुरोगामी होते . वर्धा येथील गांधीजीच्या आश्रमात जावून दोघांनीही गांधीजींची भेट घेतली. गांधीजींचे सेवाकार्य व विचारसरणीचा त्यांच्यावर प्रभाव पडला . त्याच वेळी भारतावर अपरंपार प्रेम करणारे व येथील जनतेच्या सेवेस वाहून घेणारे मॉरीस फ्रीडमन उर्फ भारतानंद, यांची व आप्पासाहेब पंत यांची गाढ मैत्री जमली . औध संस्थानात राहून सेवा कार्य करण्याचा त्यांनी निर्णय घेतला . आणि त्याची सुरुवात १९३६ साली झाली . आटपाडी येथे १९३९ साली स्वतंत्रपूर ही स्वतंत्र कैद्यांची वसाहत स्थापन करण्यात आली. येथे भारतानंदानी आपल्या कार्याला सुरुवात केली . उघड्या मानरानावर कैद्यांसाठी झोपडीवजा घरे उभारण्यात आली . या वसाहतीला कुंपन घालावयाचे नाही . कैद्यांना सामान्य नागरीकांप्रमाणे मुक्त जीवन जगु द्यायचे . असा निश्चय करून सुरुवाती पासून ६ खुनी कैद्यांना येथे आणून ठेवण्यात आले . अशा प्रकारची जगातली ही पहिलीच खुनी कैद्यांची मुक्त वसाहत होय.
येथील जमिनीत कैद्यांनी शेती करावी . अन्न धान्ये व इतर पिके घेऊन येणार्या उत्पन्नातून आपला चरितार्थ चालवावा . त्यांनी येथे सहकुटूंब रहावे . हा तुरुंग न होता हे संस्कार केंद्र किंवा मानवतेचे शिक्षण देणारे विद्यालय बनावे, ही कल्पना वर सांगीतल्या प्रमाणे काझी मास्तरांनी आपल्या अथक परिश्रमाने व सेवेने प्रत्यक्षात उतरवून दाखविली आणि नंतरच्या अनेक जेलरनी याच भावनेने सेवाकार्य केले . १९५८ पर्यत काझी मास्तरांचे कार्य सुरु होते . संस्थानचे विलीनीकरण झाल्यानंतर हा विभाग महाराष्ट्र राज्याच्या पोलीस व तुरुंग खात्याकडे सोपविण्यात आला . १९३९ ते १९४८ पर्यतच्या काळातले कैदी आणि राज्य शासनाच्या ताब्यात आल्या पासूनचे आजपर्यत शेकडो कैद्यांना, या मुक्त बंदी वसाहतीचा लाभ मिळाला आहे . शिक्षा संपवून परत गावांकडे जाताना ते आदर्श नागरीक आणि चारचौघां सारखे कुटुंब वत्सल गृहस्थ होवून गावाकडे परत गेले . गावातही ते सन्मानपुर्वक जीवन जगले . त्यांनी पुन्हा गुन्हा केल्याचे दिसून आले नाही . अशा प्रकारे कैद्यांना मुक्त वातावरणात ठेवून त्यांना परत माणूस म्हणून त्यांचे स्थान मिळवून देणारा हा प्रयोग भारताच्या एका कोपऱ्यात अविरतपणे चालु आहे . याची दखल आजवर राज्य, राष्ट्रीय स्तरावरची वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक्स मिडीया, नेते, सामाजीक – सेवाभावी संस्था, समाजसेवक, बुद्धीवादी, विचारवंत यापैकी काही अपवाद वगळता कोणीही म्हणावी तेवढी घेतली नाही.
अनेक थोर व्यक्तीनी या वसाहतीस भेटी दिल्या . कार्य चालु असल्या बद्दल भेट वहीत नोंदी ही केल्या . माजी मंत्री डी .डी . चव्हाण, राष्ट्रीय नेते खा. श्री . शरदचंद्रजी पवार, माजी विरोधी पक्षनेते रा.सु. गवई, ग .दि . माडगुळकर, व्यंकटेशतात्या माडगुळकर, शंकरराव खरात, मुकुंदराव किर्लोस्कर, वृक्षमित्र धों. म. मोहीते, सहकार महर्षि शंकरराव मोहिते – पाटील, वि .स . पार्गे न्यूयॉर्क अमेरिकेचा ब्रेन एरीसन इत्यादी शेकडो मान्यवरांचा भेटी देणाऱ्यात समावेश आहे . परंतू येथे चाललेल्या कार्याचा अधिक जोमाने विकास व्हावा . वाट चुकलेल्या गुन्हेगारांना त्याचा लाभ व्हावा, म्हणून कोणी प्रयत्न केल्याचे दिसत नाही . आजही या वसाहतीत थोडे फार कैदी आहेत . ८३ वर्षे झाली तरी हे रोपटे जोमाने वाढून त्याचा महा वटवृक्ष होत नाही . मानवतेच्या दृष्टीकोनातून चाललेले हे आदर्श काम जगातील एकमेव अद्वितीय असताना ते उपेक्षित राहीले आहे . अनेक खात्यावर पैशांची वारेमाप उधळपट्टी करणारी शासन व्यवस्था या वसाहतीकडे ढुंकूनही पहावयास तयार नाही . तुरुंग खात्याचे लोकही हा प्रयोग केवळ बंद करता येत नाही म्हणूनच चालवत आहेत असे वाटते . याची प्रसार माध्यमांनी ही आतापर्यत फारशी दखल घेतलेली नाही . त्यांनी याची दखल घ्यावी ही सार्थ अपेक्षा आहेच . अन्यथा माळरानावर उगवणारं रोपटे खत, पाण्या अभावी सुकून जाते, तसे या वसाहतीचे होईल की काय, अशी भीती उत्पन्न होते . भुतदयेतून चाललेला हा प्रयोग यशस्वी व्हावा . ही तळमळ मनास लागून राहते.
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत या वसाहतीने व येथे नेमलेल्या अधिकाऱ्यांनी कैद्यांच्या सहकार्याने गेल्या ७३ वर्षात या वसाहतीची थोडीफार प्रगती घडवून आणलेली आहे . कैद्यांनी प्रामाणीकपणे श्रम करून येथील ६५ एकर भरड माळरानाच्या जमीनीपैकी २० एकर जमीन बागायत बनविली असून आज तिथल्या वसाहती भोवती पाना फुलांनी डवरलेले हिरवेगार वृक्ष उभे आहेत . रानात अन्नधान्ये, कडधान्ये, भाजीपाला सर्व काही पिकते . हा सर्व परिसर हिरवागार व रमणीय झाला आहे . येथील अधिकारी, कर्मचारी, कैद्यांची एकजुट, परस्पर सहकार्य आणि प्रेम यांच्यामुळे हे घडू शकले आहे . जणू या सर्वांचे मिळून येथे आता एक कुटूंब बनले आहे . या दुष्काळी तालुक्यात १९६९ साली या वसाहतीमध्ये, प्रथमच हायब्रीड ज्वारीचे पीक घेतले गेले आणि हेक्टरी ४० क्विंटल हायब्रीड ज्वारीचे उत्पादन करून त्यांनी विक्रम केला . आसपासच्या परिसरातील शेतकरी हा प्रयोग पाहून गेले व हायब्रीड ज्वारीचा प्रसार सर्वत्र झाला . शाळाच नव्हे तर साक्षरता प्रसार, कुटुंब कल्याण, समाज सेवा, या कार्यातही येथील कर्मचारी व कैदी यांनी भरीव कार्य केले . बेघरांना घरे बांधून देणे, दुष्काळ पडला असता नाट्यप्रयोग व सांस्कृतीक कार्यक्रमाद्वारे तसेच रस्त्यावर काम करून या वसाहतीने शासनास मदत केली. काळाचा महिमा अगाध असतो असे म्हणतात. वास्तवीक पाहता मानासाठी रुसवे – फुगवे हे ग्रामीण जीवनातले रोज घडणारे नाट्य आहे अशाही परिस्थितीत शेतकर्यांच्या जीवनात महत्वाच्या मानल्या गेलेल्या बेंदराच्या ( बैलपोळा ) सणाला स्वतंत्रपुरच्या बैल जोड्यांना मिरवणूकीत अग्रक्रम असे . लोकाभिमुख राजाने काळाची पावले ओळखून नवे संकेत रयतेच्या पचनी पाडले होते . त्याचे हे द्योत्तक होते . सणासुदीला गोडधोड कैद्या विना गावकऱ्यांच्या घशाखाली उतरत नसे . भेटी गाठी वाढल्या, स्नेहबंद जमले आणि नाते जुळले . सामाजीक संदर्भ लाभले . हरपलेली माणूसकी पुन्हा लाभली . खऱ्या अर्थाने कारागृहातून सुटल्याचे भान बंद्याच्या मुखावर दिसू लागले . आपण चार माणसात आहोत, ही जाणीवच मुळी किती कृतार्थतेची . याची प्रचिती त्यांच्या वागण्या बोलण्यावरून येवू लागली . माणुसकीचा हा ओलावा त्यांच्या भावी जीवनाला अत्यंत प्रेरणादायक ठरत आहे.
ग . दि. माडगूळकर आणि व्यंकटेश माडगूळकर यांना या वसाहती बद्दल प्रेम होते . हा प्रयोग संपूर्ण जगाला माहीत व्हावा. अशी तीव्र इच्छा गदिमांना होती . सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्याजवळ त्यांनी या विषयावर चित्रपट काढावा असे सुचविले . या वसाहतीतील खुनी कैद्यांना एकवेळ आपल्यावर कसलीच बंधने नाहीत, तेव्हा आपण पळून जावे अशी तीव्र इच्छा झाली . आणि निम्म्या रात्री ती त्यांनी प्रत्यक्षात उतरविली . परंतु तुरुंगातील पक्क्या भिंती, मजबुत गज, हातातील बेड्या, जे काम करू शकत नाहीत ते काम काझी मास्तरांच्या प्रेमळ डोळ्यांनी केले . त्यांना मास्तरांनी दिलेले संस्कार आठवले . त्यांचे स्नेहार्द डोळे सारखे नजरेसमोर येवू लागले . ते दोन डोळे त्या सहा पळणाऱ्या कैद्यांचा पाठलाग करीत होते . आणि अखेर त्या कैद्यानी आपणहून परत स्वतंत्रपुरात येण्याचा निर्णय घेतला . आणि पहाटेच्या वेळी झोपेत असणाऱ्या काझी मास्तरांचे रडत रडत पाय धरले . त्यांची क्षमा मागितली . पुन्हा आम्ही असे वाईट कृत्य करणार नाही असे वचन दिले . हा प्रसंग ऐकून व्ही . शांताराम भारावून गेले . व त्यांनी या विषयावर चित्रपट काढण्याचा निर्णय घेतला . माडगूळकरांच्या प्रतिभासंपन्न लेखणीतून त्याची पटकथा तयार झाली . शांतारामबापूंचे दिग्दर्शन लाभले आणि त्यातून जो चित्रपट तयार झाला . तो म्हणजे *दो आँखे बारह हाथ,* हा होय . हा चित्रपट भारतातच नव्हे तर जगभर गाजला . त्यास अनेक पारीतोषीके मिळाली, परंतु ज्यावर तो बेतला होता, ते स्वतंत्रपूर नंतरही उपेक्षितच राहीले . अपुर्णता हे मानवी जीवनाचे वैशिष्ट्ये आहे . किंबुहुना अपूर्णतेचेच नाव जीवन आहे . स्वातंत्र्योत्तर काळात विकास लक्ष्मीची पाऊले अनेक माळरानावर उमटली त्यातूनच गावच्या विकासाच्या भाग्योदयाचे तांबडे फुटले .पण या पहाटेची किरणे स्वतंत्रपुरा पर्यत पोहचण्यात कसली अडचण आली हे समजत नाही . बंदिवानाच्या राबणाऱ्या हातातून व निखळलेल्या घामातून जी हिरवी संपत्ती निर्माण होते, ती पुर्णपणे विकण्याचे स्वातंत्र्य त्यांना नाही . काही गुंठ्या मध्ये पिकणारे धन महागाईच्या भष्मासुराच्या पासंगालाही पुरत नाही . मग हेचि फळ काय मम तपाला ? असा उद्वेग बाहेर पडतो . स्वतंत्रपुर अधिक स्वयंपूर्ण करण्याकरीता कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, हस्त व्यवसाय, सुत कताई, रोपवाटीका तयार करणे इत्यादी उपक्रम हातभार लावतील . यातून थोडाफार अर्थ निर्माण होऊन बंद्याचे जीवन अर्थपुर्ण होईल . या सर्वाहून अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे बंदिवानांचे पुनर्वसन . जन्मठेपेच्या शिक्षेतील शेवटची ३ वर्षे या वसाहतीत व्यतीत करणारा बंदिवान भविष्याकडे टक लावून बसलेला असतो . तिरस्काराने भरलेल्या नजरा, हेटाळणीचे सुर आणि साशंक मने यांना इथून पुढे तोंड द्यावे लागणार नाही,याची हमी मिळावी . या गोष्टीची त्याला मानसीक गरज असते म्हणूूनच वसाहतीतून बाहेर पडल्यानंतर जगाच्या बंदिशाळेत प्रवेश करीत असताना सुलभ पतपुरवठ्याची तरतुद, शक्य त्या ठिकाणी नोकऱ्यात राखीव जागा, कुशल कारागीरांना औजारांची उपलब्धता इत्यादी उपाय बंदिवानांच्या दुखऱ्या मनावर हळूवार फुंकर घालण्यात मदत करतील . किरण बेदींच्या मेगासेसे पुरस्काराचे कौतुक आहेच . नव्हे सार्थ अभिमानही आहे . पण स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे होवून देखील स्वतंत्रपुरातील अनेक किरण, बेदी होवू शकले नाहीत ही खंतही आहेच . उशीरा का होईना या प्रयत्नाला दाद मिळावी ही अपेक्षा आहेच . गेली ८३ वर्षे सुरु असलेल्या या उपक्रमाला अधिक विस्तारण्याची वेळ आलेली आहे .पुरुष कैद्या प्रमाणेच जन्मठेपेतील महिला कैद्यानांही शेवटची दोन वर्षे इथे सह परिवार वास्तव्य करण्याची स्वतंत्र सोय केली जावी . नाशिक मधील बाल गुन्हेगारांच्या बोस्टन सुधारगृह शाळेप्रमाणे स्वतंत्रपूर येथे बाल सुधारगृहाची वेगळी व्यवस्था करावी . दोन ते पाच वर्षे शिक्षा झालेल्या तरुण आणि तरुणी कैद्यांना नर्सिंग सारख्या कोर्सची व्यवस्था करून त्यांना कमवा आणि शिका ही योजना लागू करावी . शासनाच्या अत्यावश्यक आणि साथ नियंत्रण विभागामध्ये या सिस्टर आणि ब्रदर्सना, शिक्षेनंतर नोकरीची तरतूद करावी . किमान ५०० जणांना एका वेळेस शिक्षित करता येईल, इतकी प्रशस्त प्रशिक्षण यंत्रणा स्वतंत्रपुराची नवी ओळख बनावी . या सर्व सोयींचा फायदा आटपाडी तालुक्यातील सामान्य कुटुंबातील मुले, महिला, युवक, युवती यांनाही मिळावा . यासाठी २० टक्के जागा स्थानीक जनतेसाठी राखून ठेवाव्यात . त्यांना ते कैदी नसले तरी या सुविधा देण्यात याव्यात . या सर्व प्रकल्पांसाठी स्वतंत्रपूर वसाहती शेजारी शेकडो एकर डबई कुरणाची जमीन उपलब्ध आहे. लगतच्या शेतकऱ्यांच्या शक्य वाटल्यास आणखी काही जमिनींचे अधिग्रहण करावे . स्वतंत्रपुराला लागूनच २५० एम.सी.एफ.टी. चा आटपाडी तलाव आहे . हा तलाव २ टी.एम. सी. क्षमतेचा करण्या इतपत वाव आहे. त्यामुळे स्वतंत्रपुरात , अथवा जवळ हे उपक्रम राबविण्यासाठी जमीन आणि पाण्याची कोणतीही कमरता भासणार नाही . या मानवतावादी संस्कार केंद्रासाठी राज्य व केंद्र सरकारने तातडीने मोठा निधी उपलब्ध करून, जागतिक उंचीचे परिवर्तन साकारावे . महाराष्ट्र शासन प्रत्येक जिल्ह्यातील जेलचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे . त्यांना बऱ्याचदा जागेचा प्रश्न भेडसावतो . मात्र कैद्यांमध्ये सामाजीक, कौटुंबिक वादातून झालेले गुन्हे आणि गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्ती , टोळ्यांनी केलेले गुन्हे असे दोन भाग केले तर किमान सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातील कौटुंबीक, सामाजीक गुन्हयातील आरोपी , प्रोफेशनल ( सराईत ) गुन्हेगारांपासून वेगळे करून त्यांचे जीवनमान सुधारता येईल . आजच्या घडीला जेल मध्ये गेलेला सामान्य व्यक्तीही, बाहेर आल्यानंतर काही अपवाद वगळता अधिक मोठा गुन्हेगारच होत आहे . जेल विद्यापीठ अशी संकल्पना त्याबाबत रूढ होवू लागली आहे. यातून समाजातल्या या नकळत गुन्हेंगार बनलेल्यांना सुधारणेच्या प्रक्रियेत आणण्यास मदत करणाऱ्या या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार व्हावा आणि निर्णायक पाऊल टाकले जावे . आज गुन्हेगारांना डांबण्यासाठी जेल अपुरे पडत आहेत . माणसाला सुधारण्यासाठी तुरुंगात डांबायची, ही मुळ संकल्पना कुठे तरी मागे पडली आहे. शिक्षा झालेल्या व्यक्तीला अधिक गंभीर गुन्हेंगार बनू देण्यापेक्षा त्याला माणसात आणण्यासाठी , आपल्या माणसांसोबत खुल्या कारागृहात शिक्षा भोगत जीवन जगायला देण्याची संधी, ही संकल्पना जगाहून निराळी आणि मानवतावादी आहे . कारागृहाऐवजी खुली कारागृहे वाढविली, अथवा त्यांची व्याप्ती वाढविली तर कदाचित भविष्यात गुन्हेगारी कमी होवून तेवढ्या संख्येने कारागृहे ही बंद करावी लागतील, असा या विचारा मागचा आशावाद आहे.