दैनिक स्थैर्य । दि. २० एप्रिल २०२२ । आटपाडी । आटपाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या एकुण 26 जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न झाला. जिल्हा परिषद शाळांचा वाढलेला दर्जा पालकांना कळावा व जिल्हा परिषद शाळांमधे पटसंख्या वाढुन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने जिल्हा परिषद शाळांमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद शाळा नंबर 1 व 3 तसेच शिवाजीनगर येथील मेळाव्याचे उद्घाटन गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील यांनी केले. शालेय विद्यार्थ्यांचे अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात गुलाबपुष्प देऊन औक्षण करून व क्षमता चाचणी घेऊन बालचमूंचे स्वागत करण्यात आले. नवोदित दाखल मुलांनीही शाळेत येताना नवनविन पोशाख घालून येऊन आनंदात प्रतिसाद दिला.आटपाडी गावातील सर्वच २६ जिल्हा परिषद शाळांमधील सर्वच शिक्षक वर्ग अपार कष्ट घेत असल्यामुळे जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारल्यामुळे मागील वर्षी अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र ठरले त्यामुळे आज अनेक हूशार अभ्यासु पालकांनी त्यांच्या पाल्यास आज जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिली इयत्तेत प्रवेश घेऊन उंचाक केला त्यामुळे सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील यांनी सर्व शिक्षकांचे व विद्यार्थी पालकांचे कौतुक केले. यावेळी केंद्र प्रमुख मैना गायकवाड मॅडम, मुख्याध्यापक, विद्यार्थी,पालक, शिक्षक ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.