
स्थैर्य, पांचगणी, दि. ०४ : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा शाखा भिलार येथे ए.टी.एम. सेवेचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब भिलारे, यांचे शुभहस्ते तसेच प्रमुख पाहुणे व बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे, विभागीय विकास अधिकारी वसंत बेलोशे व मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी बाळासाहेब भिलारे म्हणाले, स्ट्रोबेरी उत्पादक शेतकऱ्यांसाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हि आपुलकीचा झरा असून सध्याच्या कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात पुस्तकांचे गाव व परिसरातील ग्राहकांची होणारी एटीएमची गरजही बँकेने भरून काढली आहे. बँकेने नेहमीच ग्राहकाभिमुख धोरणांचा स्वीकार केला आहे तसेच अधिकाधिक सामान्य ग्राहकांपर्यंत बँकिंग सुविधा मिळाव्यात याकरिता शहरी व ग्रामीण भागात शाखा कार्यान्वित केल्या आहेत. दर्जात्मक, अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त बँकिंग सेवा सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यास बँक यशस्वी झाली असून बँकेच्या विकासाभिमुख योजनाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी संचालक राजेंद्र राजपुरे म्हणाले, या ठिकाणी नवीन ए.टी.एम. सुविधा सुरु होत असलेमुळे ग्राहकांना उत्तम सेवा-सुविधा मिळणार आहेत. देशात सहकार क्षेत्रात चांगला नावलौकिक मिळविलेल्या बँकेने सहकारी बँकिंगपुढे चांगला आदर्श निर्माण केलेला आहे. जिल्हा बँक कायमच सामाजिक बांधिलकी जपत असून शेतकरी सभासदांचे आर्थिक जीवनमान उंचावणेसाठी कटीबद्ध आहे.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, बँकेच्या उत्कृष्ट कामकाजामुळे नाबार्डने सलग ६ पुरस्कार देऊन गौरविले असून बँकेने सहकार क्षेत्रात चांगल्या कामकाजाचा ठसा उमटविलेला आहे. या बँकेचे जेष्ठ संचालक व विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शनाखाली विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. बँकेने ग्राहकांना आधुनिक बँकिंगच्या सुविधा उपलब्ध करून देणेसाठी कोअर बँकिंग प्रणालीचा उपयोग केला असून ग्राहकांना तसेच समाजातील गरजू व वंचित घटकांना विकसित तंत्रज्ञानाच्या बँकिंग सोई सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यावेळी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी स्ट्रोबेरी शेती व पॉलिहाउससाठी आर्थिक नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी बँकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे, भिलारच्या सरपंच वंदना भिलारे, शशिकांत भिलारे, सुभाष भिलारे, गणपत पार्टे, श्रीराम दुध सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी भिलारे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत भिलारे, श्रीमती नंदा भिलारे, प्रवीण भिलारे, विभागीय विकास अधिकारी वसंत बेलोशे, विकास अधिकारी गजानन राजपुरे, तालुक्यातील सर्व सेवक वर्ग , विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे चेअरमन, सचिव, पदाधिकारी, शाखेचे अधिकारी व महिला वर्ग व सदस्य, ग्राहक, ठेवीदार व हितचिंतक , जेष्ठ नागरिक व तरुण उपस्थित होते.