दैनिक स्थैर्य । दि. १२ डिसेंबर २०२१ । मुंबई । उत्तराखंडचे सुपुत्र असलेले जनरल बिपीन रावत हे द्रष्टे सरसेनापती होते. भारतीय सैन्य दलांच्या आधुनिकीकरणाचे त्यांनी सुरु केलेले कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
तिन्ही सैन्य दलांचे सर्वोच्च प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शनिवारी राजभवन येथे एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
यावेळी मधुलिका रावत व हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या इतर अधिकाऱ्यांना देखील श्रद्धांजली वाहण्यात आली.
शोकसभेचे आयोजन हिमालय पर्वतीय संघ या उत्तराखंड येथील महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या नागरिकांच्या संघटनेने केले होते.
कार्यक्रमाला हिमालय पर्वतीय संघाचे अध्यक्ष चामूसिंह राणा व नवभारत टाइम्सचे निवासी संपादक सुंदरचंद ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते.