दैनिक स्थैर्य । दि. १४ मार्च २०२३ । मुंबई । महाराष्ट्रातील पर्यटनाला जागतिक पातळीवर चालना देण्यासाठी ७ ते ९ मार्च, २०२३ या कालावधीत प्रतिष्ठित आयटीबी बर्लिन व्यापार मेळ्याव्यात राज्याच्या पर्यटन विभागाने सहभाग घेतला. परदेशी पर्यटकांना आकर्षित करणारे महाराष्ट्र हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे.
राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली तसेच पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी शर्मा आणि पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पर्यटन विभाग आयटी बी बर्लिन व्यापार मेळावा २०२३ मध्ये सहभागी झाले. महाराष्ट्र पर्यटन पॅव्हेलियनचे औपचारिक उद्घाटन भारत पर्यटन विभागाचे सचिव अरविंद सिंग आणि भारताचे जर्मनी येथील राजदूत पार्वथनेनी हरीशजी यांच्या हस्ते झाले.
यावर्षी आय टी बी बर्लिन व्यापार मेळाव्यामध्ये जवळ जवळ १६१ देश तसेच १०,००० पेक्षा जास्त प्रदर्शकांनी सहभाग नोंदवला. त्याठिकाणी महाराष्ट्र राज्याची वैभवशाली संस्कृती, समृद्ध इतिहास, निळे समुद्रकिनारे असलेल्या महाराष्ट्राची वैशिष्ट्ये सर्वांसमोर मांडण्यात आली. दीर्घ काळापासून प्रवास आणि पर्यटन परिसंस्थेतील व्यवसायासाठी हा मेळावा उत्प्रेरक ठरला आहे.
आयटीबी बर्लिन व्यापार मेळाव्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाने एक सुसज्ज पॅव्हेलियन उभारले होते. या वर्षी महाराष्ट्र पर्यटन विभागाने सहप्रदर्शकांना भागधारकांची भेट घेता यावी यासाठी ८३ चौ. मी. इतक्या आकाराचे प्रशस्त व लक्षवेधी दालन उभारले होते तसेच दर्शकांना महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अनुभव घेता यावा यासाठी काही सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र पर्यटन विभागाबरोबरच अनेक सह-प्रदर्शक देखील या मेळाव्यात सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील खासगी ट्रॅव्हल्स ट्रेडच्या प्रतिनिधींमध्ये फाजलानी नेचर नेस्ट, गोवर्धन इको व्हिलेज बॉलीवुड पार्क, कॅप्टन निलेश हॉलिडेज, एबिक्स ट्रॅव्हल अँड हॉलिडेज लिमिटेड (डेक्कन ओडिसी), नमस्ते टूर्स प्रा. लि., स्वदेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि वीणा वर्ल्ड अशा पर्यटन आयोजित करणाऱ्या संस्था सामील झाल्या होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आणि अधिकारी मानसी कोठारे यांनी परिश्रम घेतले.