सागर बंगल्यावर उदयनराजे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत खलबते; राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना जोर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ जून २०२२ । सातारा । भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर उत्स्फूर्त भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये वेगवेगळ्या राजकीय विषयांवर चर्चा झाली. या भेटीचे राजकीय वर्तुळामध्ये चांगलेच पडसाद उमटले आहेत. या भेटीमध्ये उदयनराजे यांनी फडणवीस यांची कुशल रणनीती बद्दल पुष्पगुच्छ देऊन विशेष अभिनंदन केले. आता कोणी धमक्या दिल्या तर मला सांगा मी आहेच अशा जोरदार राजकीय टिपणीवर उदयनराजेंनी या भेटीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात घडवली.

खासदार उदयनराजे भोसले राष्ट्रपती निवडणूक प्रक्रियेसाठी गेल्या दोन दिवसापासून दिल्लीमध्ये होते. शुक्रवारी त्यांनी थेट मुंबईमध्ये एन्ट्री घेत येथील सागर बंगल्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची विशेष भेट घेतली आणि राज्यात होत असलेल्या सत्तापालट प्रक्रियेमध्ये चाणक्याची भूमिका बजावणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष अभिनंदन केले. राज्यात भाजपचे सरकार येणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम माझ्याकडून अभिनंदन असे म्हणत खा. उदयनराजे यांनी देवेंद्र फडणवीस यांना शाल प्रदान केली आणि त्यांच्या पुढील राजकीय रणनीतील मनापासून शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांमध्ये बराच काळ वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्याचे उदयनराजे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

फडणवीस यांच्या भेटीनंतर मुंबईत प्रसारमाध्यमांनी त्यांना गाठले असता खा. उदयनराजे यांनी नेहमीच्या शैलीत आक्रमक उत्तरे दिली. ते म्हणाले जे तुटायचे होते ती युती आता तुटलेली आहे. सरकार पडले आहे. कोणीही धमक्या देऊ नयेत ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. असल्या पोकळ कोणत्या धमक्यांना मी भीक घालणार नाही. पुन्हा धमक्या आल्या तर मला सांगा मी बघतोच, असा इशारा त्यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये दिला आहे.


Back to top button
Don`t copy text!