स्थैर्य, सातारा, दि. 21 : येथील राजवाडा बसस्थानक गेले तीन महिने बंद आहे. 23 मार्चपासून सातार्यात लॉकडाउन सुरू झाल्यामुळे शहरातील बससेवाही बंद करण्यात आली होती. गेले तीन महिने बंद असलेले राजवाडा बसस्थानक कचर्याच्या विळख्यात सापडले आहे. यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सेवा बंद असल्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची वर्दळ नव्हती. लॉकडाउनमध्ये बसस्टॉप परिसरातील क्राँक्रीटीकरण करण्यात आले. बससेवा बंद असल्यामुळे या परिसरात प्रवासी फिरकलेही नाहीत. मग हा कचरा कोठून आला? सध्या वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे स्वच्छतेचा प्रसार केला जात आहे. असे असताना मात्र राजवाडा बसस्थानकात घाणीचे साम्राज्य वाढले आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मद्य विक्रीची दुकाने सुरू झाल्यावर बसस्थानकात मद्यपी दारू पित बसत. त्यांनी खायला आणलेल्या खाद्य पदार्थ्यांच्या पिशव्या, कागद, पाण्याच्या, शितपेये यांच्या रिकाम्या बाटल्या येथे साचल्या जात. भंगारवाले बाटल्या नेत पण कागदाचे बोळे, कचरा तसाच साचून आहे.
लॉकडाउनमध्ये फक्त जीवनावश्यक वस्तूंची विक्रीच सुरू होती. या वस्तूंची विक्री करताना अनेक किराणा माल दुकानदार, फळविक्रेत्यांनी ग्राहकांना वेठीस धरले होते. कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे भाजी विक्रेते रस्त्यावर बसत होते. हे भाजी विक्रेते तसेच परिसरात फिरावयास येणार्या नागरिकांनी येथे कचरा टाकल्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढले आहे. या परिसरात कचरा टाकणार्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. ज्याप्रमाणे तोंडाला मास्क न लावणे, रस्त्यावर थुंकणे कायद्याने गुन्हा आहे त्याप्रमाणे रस्त्यावर कचरा टाकणे यावरही बंदी करावी. रस्त्यावर कचरा टाकणारे भाजीवाले, फळवाले तसेच नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
प्रशासनाने आपल्यासाठी विविध सोईसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सगळ्यांचीच अपेक्षा असते. मात्र यासाठी आपलीही काहीतरी सामाजिक बांधिलकी आहे असे समजून प्रत्येकाने स्वच्छतेची सुरुवात स्वत:पासूनच करावी.
कालपासून बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांची वर्दळ येथे सुरू होत आहे. सध्या कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन या कचर्याची त्वरित विल्हेवाट लावून येथे जंतुनाशकाची फवारणी करावी, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.