दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑगस्ट २०२३ | फलटण |
कृषी महाविद्यालय फलटण येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनींनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२४ कार्यक्रमांतर्गत पिंपरद येथील शेतकर्यांना वाढत्या कीटकांचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी व त्यामुळे होणारी पिकांची हानी रोखण्यासाठी बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
रब्बी हंगामामध्ये ज्वारी या पिकावरती पेरणीनंतर तीन आठवड्यांपासून सव्वामहिने या कालावधीत खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून येतो. ही माशी झाडाच्या शेंड्यावर अंडी देते. त्यातून छोटीशी अळी बाहेर पडते, ती झाडाच्या पोग्यामधे जाऊन पोगा खाते. त्यामुळे झाड जळून जाते. या खोडमाशीचे नियंत्रण करण्यासाठी कृषीकन्यांनी इमिडाक्लोप्रिड कीटकनाशकाची पेरणीपूर्वी ज्वारीच्या बियांना बीजप्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
यावेळी पिंपरद गावच्या सरपंच स्वाती भगत यांच्यासमवेत २२ शेतकरी उपस्थित होते. कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम, निशिकांत यादव सर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली कृषीकन्या कु. आर्या जाधव, प्रणिता गोडसे, निशिगंधा खुडे, अक्षदा जाधव, प्रतीक्षा जगताप, समृद्धी जगताप, आरती जाधव यांनी हे प्रात्यक्षिक करून दाखविले.