स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 16 : पूर्व लडाखमधील गलवान खोर्यात चीन आणि भारतीय सैन्य यांच्यात चकमक झाल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव असताना मोठी बातमी समोर आली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार चीनसोबत झालेल्या चकमकीत जवळपास 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. सरकारी सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे. शहीद जवानांची संख्या अजून वाढण्याची भीती आहे. यापूर्वी एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाल्याची माहिती होती. सोमवारी रात्री भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांसमोर आले होते. यावेळी दोन्ही सैन्यांमध्ये झटापट झाली होती.
दरम्यान, या चकमकीत चीनचेही नुकसान झाले आहे. चीनचे सैनिकही मोठ्या प्रमाणात मारले गेले असून अनेक सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, ही संख्या 43 इतकी आहे.
भारत आणि चीनमध्ये सध्या तणाव असून चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये सोमवारी रात्री हिंसक चकमक झाली. यावेळी कोणताही गोळीबार झाला नसल्याचे भारतीय लष्कराने स्पष्ट सांगितले आहे. पण यावेळी दोन्ही देशांचे सैन्य आपापसात भिडले होते. यामध्ये दोन्ही देशांचे नुकसान झाले असल्याचे समोर येत आहे.
चीनने भारतीय सैन्यांनी वास्तविक नियंत्रण रेखा पार करून दोन वेळा आपल्या सैन्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, भारताकडूनही परराष्ट्र मंत्रालयाने संपूर्ण घटनाक्रम सांगण्यात आला असून चीनकडून वास्तविक नियंत्रण रेखा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 15 जूनच्या रात्री चीनकडून एकतर्फीपणे वास्तविक नियंत्रण रेषेवरील सद्यस्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी झालेल्या चकमकीत दोन्ही सैन्यांचे नुकसान झालं आहे जे टाळता आले असते. चीनकडून 6 जून रोजी दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यावर तसेच वाद कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यासंबंधी झालेल्या सहमतीचं उल्लंघन करण्यात आले.
सीमा परिसरात शांतता नांदली पाहिजे आणि चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढला पाहिजे या भूमिकेवर आम्ही अद्यापही ठाम आहोत. पण याचवेळी भारताचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
सीमा व्यवस्थापनाकडे एक जबाबदार देश म्हणून पाहताना भारत वास्तविक नियंत्रण रेषेच्या आतमध्ये राहूनच हालचाल करणार हे स्पष्ट आहे. चीनकडूनही आम्ही तशीच अपेक्षा करत आहोत, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही बाजूंनी गोळीबार झालेला नाही. झटापटीत ही जीवितहानी झाल्याची माहिती आहे. भारत आणि चीन सैन्यावर शेवटचा गोळीबार 1975 ला झाला होता. गलवान खोर्यात आता 45 वर्षांनंतर गोळी चालवण्यात आली आहे. चीनने गलवान खोर्याच्या बाबतीत सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. पण भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चा सुरू होती. गलवान खोर्यातील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू होते. त्यातच सोमवारी रात्री हिंसक झडप झाली आणि यात भारतीय जवान शहीद झाले. लष्करी स्तरावर सकारात्मक चर्चा होत असतानाच हा हिंसक प्रकार झाल्याने चिंता वाढली आहे. भारतीय जवान शहीद झाल्यानंतर सैन्याने चीनलाही सडेतोड प्रत्युत्तर दिले असणार यात शंका नाही, असे जाणकार सांगतात. पण याबाबतची खात्रीलायक माहिती भारतीय लष्कराकडून अजून देण्यात आलेली नाही.
यापूर्वी कमांडर स्तरावर झालेल्या चर्चेत काही मुद्द्यांवर सहमती झाली होती. गलवान खोर्यातील पेट्रोलिंक केंद्र क्रमांक 14 आणि 15 वर गस्ती थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता तर हॉट स्प्रिंग भागातील गस्ती थांबवण्याबाबतही सहमती झाली होती. या भागातून भारतानेही आपला ताफा आणि सैन्य काहीसे मागे घेतले होते. सूत्रांच्या मते, या क्षेत्रातील तणावावर बटालियन कमां-डर यांच्या स्तरावर चर्चा होत आहेत.
चिनी सैन्याला आता उत्तर देण्याची
वेळ आली आहे : कॅप्टन अमरिंदर सिंगलडाखच्या गलवान खोर्यात भारत चीन सीमेवर झालेल्या दोन्ही सैन्यांच्या हिंसक चकमकीत भारताचे तीन जवान शहीद झाले. यावर पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्विटरच्या माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सतत असे कृत्य करणार्या चीनविरोधात भारत सरकारने कडक पावले उचलण्याची आता वेळ आली आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, की गलवान खोर्यात चिनी सैन्याकडून अशाप्रकारे वारंवार उल्लंघन होत आहे. आता या घुसखोरीला उत्तर देण्याची वेळ आली आहे. आमचे जवान कोणत्याही खेळाचा भाग नाहीत. दर काही दिवसांनी सीमेच्या रक्षणासाठी आपले काही अधिकारी व जवान शहीद होत आहेत.
चीनचं म्हणणं काय?
भारतीय जवानांचे प्राण घेणार्या चीनने भारताविरोधात बोंबा मारण्यास सुरुवात केली आहे. भारतीय सैन्यानेच चीनच्या सैनिकांवर हल्ला केला. त्याच्या प्रत्युत्तरात भारतीय जवानांना प्राण गमवावे लागले असल्याचे चीनने म्हटले आहे.
मागील महिन्यापासून लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. चिनी सैन्याने भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्यानंतर दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने उभे ठाकले होते. तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशातील लष्करी अधिकार्यांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र, सोमवारी दोन्ही बाजूने सैन्यांमध्ये चकमक घडली असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारताने पहिला हल्ला केल्यानंतर चीनने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. या चकमकीत दोन्ही बाजूंचे जवान जखमी झाले असल्याचे चीनने म्हटले आहे.
तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसोबत तातडीची बैठक
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसोबत तातडीची बैठक घेतली. सोमवारी रात्री नेमके काय घडले याचा आढावा त्यांनी या बैठकीत घेतला. दरम्यान रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लडाखच्या परिस्थितीची माहिती दिली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत उशिरापर्यंत माहिती मिळू शकली नाही.