दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
आसू, ता. फलटण येथे प्रथमच मराठा समाजाच्या वतीने राजकीय पुढार्यांना गावबंदी व कोणत्याही पक्षाचा राजकीय कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे. येथून पुढे कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांना गावात फिरू देणार नसल्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
आज, रविवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी आसू बसस्थानकासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर कायमस्वरूपी असून मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला आम्ही शेवटपर्यंत समर्थन देणार आहोत. आम्ही मराठा आरक्षणासाठी काहीही करायला तयार असल्याचे मत मराठा समाजाच्या वतीने यावेळी व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, आसू गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने आगामी निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. येत्या २५ तारखेला फलटण तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे मराठा क्रांती समाजाचे माऊली सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितले.
मराठा समाज पूर्वीचा व आत्ताचा यामध्ये खूप बदल झाला आहे. आज नोकरी, शिक्षणामध्ये आरक्षणाची अत्यंत गरज आहे. पूर्वी समाजामध्ये गरज नव्हती, पण आता ती गरज महत्वाची आहे. आम्ही छत्रपती शिवरायांचे विचार मांडणारे असून छत्रपती घराण्याशी आमचे नातेसंबंध आहेत. त्यामुळे मराठा समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न जर राजकीय मंडळी करत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा इशारा श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी यावेळी दिला.
सकल मराठा समाजाच्या वतीने राजकीय पुढार्यांना गावबंदी व मतदानावर बहिष्कार, असा मोठा फलक एसटी बसस्थानकासमोर लावण्यात आला आहे. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाजातील युवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार स्वामी साबळे यांनी मानले.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे प्रयत्न करीत असताना स्वतःला मराठा समजणारे व केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आम्हाला कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे नाही, असे सांगून समाजात सामाजिक तेढ निर्माण करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याशी तीन पिढ्यांचे आमचे संबंध आहेत, त्यामुळे आम्हासह सर्वांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळवायचे असून गोरगरीब मराठा समाजातील तरुणांना शिक्षण व नोकरीत त्याचा फायदा होईल. त्यामुळे नारायण राणे किंवा रामदास कदम हे आपल्या पक्षाच्या भूमिका मांडत असून, ती भूमिका मराठा समाजात तेढ निर्माण करणारी आहे. त्यामुळे आरक्षण मिळविण्यासाठी हे चुकीचे ठरेल, हे मी सांगतो व त्यांचा मी जाहीर निषेध करतो.
– श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, संचालक, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, सातारा
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भूमिका ही सकल मराठा समाजाची असून त्यांनी सुरू केलेला लढा आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही, त्यामुळे आता आम्ही मराठा समाजातील पहिल्या व दुसर्या फळीतील राजकीय पुढार्यांना लेखी विचारणार असून तुम्ही राजकीय पक्षाबरोबर की गोरगरीब मराठा समाजाबरोबर? तशी तुम्हाला शपथ घ्यावी लागेल, नाहीतर तुम्हाला येणार्या सर्वच निवडणुकीत फलटण तालुक्यात ५० टयांहून अधिक असलेला मराठा समाज तुम्हाला व तुमच्या पक्षाला जागा दाखवेल.
– माऊली सावंत, समन्वयक मराठा क्रांती मोर्चा, फलटण