आसूमध्ये ‘स्वदेशी’चा जागर; २५ वर्षांची अविरत चळवळ कौतुकास्पद : शिवरूपराजे खर्डेकर


आसू (ता. फलटण) येथे राज्यस्तरीय स्वदेशी साहित्य संमेलन संपन्न. राजीव दीक्षितांच्या विचारांतून २५ वर्षे सुरू असलेल्या चळवळीचे शिवरूपराजे खर्डेकर यांनी केले कौतुक. वाचा सविस्तर.

स्थैर्य, आसू (ता. फलटण), दि. 05 डिसेंबर : “स्वर्गीय राजीव दीक्षित यांच्या आसू येथील वास्तव्याने आणि निकटच्या सहवासामुळे येथील तरुण वर्गाने २५ वर्षांपूर्वी स्वदेशीचा विचार स्वीकारला. एका छोट्याशा खेड्यात स्वदेशीची ही चळवळ आजही तितक्याच प्रभावीपणे राबवली जात आहे, ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे,” असे गौरवोद्गार सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी काढले.

आसू (ता. फलटण) येथे स्वर्गीय राजीव दीक्षित यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय ‘स्वदेशी साहित्य व कवी संमेलना’त ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता होते. यावेळी राज्यभरातील विविध साहित्यिकांना ‘स्वदेशी भारत सन्मान’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

राजीव दीक्षितांच्या विचारांचा वारसा

शिवरूपराजे खर्डेकर पुढे म्हणाले, “राजीव दीक्षित यांचे विचार आणि सहवास अनेकांना प्रेरणा देऊन गेला. आसू सारख्या ग्रामीण भागातील प्रकाश सकुंडे गुरुजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या २५ वर्षांपासून ही चळवळ जिवंत ठेवली आहे. त्यांच्या आचरणातून भारतीय संस्कृतीची ओळख होते. यापुढेही ही चळवळ अशीच सुरू ठेवावी, त्यासाठी आम्ही सदैव पाठीशी राहू.”

स्वदेशीचा नारा आणि आर्थिक लुट

अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी स्वदेशीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या नावाखाली भारताची मोठी आर्थिक लूट केली. आपलीच उत्पादने परदेशात नेऊन, त्यावर विदेशी लेबल्स लावून ती पुन्हा आपल्यालाच विकली गेली. या विरोधात राजीव दीक्षित यांनी प्रखर आवाज उठवला. आज साहित्यातून हाच विचार पुढे नेण्याची गरज आहे.” साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून स्वदेशीचा विचार घराघरांत पोहोचवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी प्रा. इंद्रजित पाटील (बार्शी), सर्वोदयी कार्यकर्ते जीवन इंगळे, महानुभाव पंथातील अभ्यासक नरेंद्र शास्त्री, कवी हनुमंत चांदगुडे, जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष प्रमोद झांबरे यांच्यासह धुळे, अमरावती, मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि विदर्भातून आलेले साहित्यिक उपस्थित होते.

काव्यसंमेलन आणि पुरस्कार वितरण

प्रारंभी प्रकाश सकुंडे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या साहित्यिकांना स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि वृक्षाचे रोप देऊन गौरवण्यात आले. दुपारच्या सत्रात कवी प्रमोद जगताप यांच्या अध्यक्षतेखाली खुले काव्यसंमेलन पार पडले. यामध्ये हनुमंत चांदगुडे, गंगाराम कुचेकर, किरण माने, सुरेश कुलकर्णी यांच्यासह अनेक कवींनी रचना सादर केल्या. पुढील वर्षाच्या काव्यसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून कवयित्री मनीषा मिसाळ (दहिवडी) यांची निवड करण्यात आली. सूत्रसंचालन बाबासाहेब ढोबळे यांनी केले तर आभार नानासाहेब मुळीक यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!