आसू येथील मारहाण व जातीवाचक शिवीगाळ प्रकरण; संशयिताला तात्काळ अटक करा, समस्त बौद्ध समाज बांधवांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन


फलटण तालुक्यातील आसू येथे महिलेला मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी संशयिताला तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी समस्त बौद्ध समाज बांधवांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. वाचा सविस्तर.

स्थैर्य, फलटण, दि. 04 डिसेंबर : फलटण तालुक्यातील आसू येथे चारचाकी गाडी आडवी मारून एका दाम्पत्याला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना ३० नोव्हेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही संशयित आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या निषेधार्थ आणि संशयिताला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी आसू येथील समस्त बौद्ध समाज बांधवांनी मंगळवारी (दि. २) फलटणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

नेमकी घटना काय?

निवेदनात नमूद केल्यानुसार, ही घटना ३० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. फिर्यादी महिला आणि त्यांचे पती आसू बाजूकडून बारामतीकडे निघाले होते. यावेळी नीरा नदीवरील आसू-तावशी बंधाऱ्यावर समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीच्या (एम. एच. ४२ सी.एस. ४५४५) चालकाने आपली गाडी भरधाव वेगाने चालवत फिर्यादींच्या गाडीला आडवी मारली.

संशयिताने फिर्यादी महिलेच्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादी महिलेने जाब विचारला असता, संशयिताने त्यांनाही गालावर, नाकावर आणि छातीवर बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, “तुम्ही खालच्या जातीचे, तुम्ही माज दाखवताय का? तुम्हाला गावात राहू देणार नाही,” अशा शब्दांत जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

पीडित कुटुंबाला संरक्षणाची मागणी

सदर घटनेतील संशयित हा राजकीय पार्श्वभूमी असलेला आणि धनवान व्यक्ती असून तो पीडित कुटुंबावर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निवेदनात म्हटले आहे. फिर्यादी यांचे घर गावापासून लांब असून शेतात वस्ती आहे, त्यामुळे संशयितांपासून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे आणि संशयिताला तात्काळ अटक करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

प्रशासनाचे आदेश

बौद्ध समाज बांधवांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन फलटणच्या उपविभागीय अधिकारी (SDO) सौ. प्रियांका आंबेकर – ठोकळ यांच्या कार्यालयात दिले. यावर तत्काळ दखल घेत उपविभागीय अधिकाऱ्यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना सदर निवेदनावर उचित कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

यावेळी ॲड. प्रेम आदेश अहिवळे यांच्यासह आसू आणि फलटण परिसरातील समस्त बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!