
स्थैर्य, फलटण, दि. ०७ : फलटण तालुक्यातील आसू येथील ग्रामस्थांच्या आग्रहास्तव आसू, ता. फलटण येथे कोरोना लसीकरण केंद्र लवकरच सुरु करण्यात येईल, अशी ग्वाही सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाशी लढण्यासाठी लस घेणे अतिशय महत्त्वाचे आहे ही गोष्ट लक्षात घेता आसू येथील ग्रामस्थांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून लस घेण्यासाठी बरड येथील आरोग्य सेवा केंद्रात तसेच पवारवाडी येथील उपआरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करून घ्यावे लागत आहे. परंतु यामुळे ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून बर्याच जणांना आरोग्य सेवा केंद्रात जाऊनसुद्धा लस मिळाली नाही. काहीजणांना लस न घेताच माघारी परतावे लागले. त्यामुळे लोकांमधून प्रकर्षाने आसु गवात लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी होत होती. याच मागणीची दखल घेऊन सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर यांनी आसू येथे कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्यात येईल अशी ग्वाही दिलेली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की आसू मधील ग्रामस्थांनी सुरवातीला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे, त्यानंतर ग्रामसेवक यांच्याकडून कुपन देऊन तुम्हाला दिवस दिला जाईल त्या दिवशी येऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसू या ठिकाणी लसीकरणाचा लाभ घ्यावा व लसीकरणाला येताना मास्क व कोरोना संदर्भात जे काही नियम असतील त्या नियमांचे पालन करावे व त्याठिकाणी कोणीही गर्दी करू नये, असे आवाहनही श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर यांनी केलेले आहे.