स्थैर्य, फलटण : कै.मुरलीधर शिंगोटे यांना श्रद्धांजली अर्पण करताना रविंद्र बेडकिहाळ, यशवंत खलाटे – पाटील, नसीर शिकलगार, संजय जामदार, बाळासाहेब ननावरे, रोहित वाकडे, विनायक शिंदे, युवराज पवार, शक्ती भोसले.
स्थैर्य, फलटण : वृत्तपत्रविक्रेता ते एका मोठ्या वृत्तपत्रसमूहाचे संस्थापक, संपादक असलेल्या कै.मुरलीधर शिंगोटे उर्फ बाबा यांच्या आयुष्याचा प्रवास थक्क करणारा आहे. 25 विविध वृत्तपत्र प्रकाशनांचा उद्योग सांभाळताना पूर्वीप्रमाणेच ‘साधी राहणी; उच्च विचारसरणी’ च्या सूत्रानुसार ‘गरिबी न विसरलेले श्रीमंत वृत्तपत्र मालक संपादक’ अशी त्यांची जीवनधारा आजही वृत्तपत्र उद्योगात सर्वांना प्रेरणा देत राहील, अशा शब्दात महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी पुण्यनगरी वृत्तपत्रसमूहाचे सर्वेसर्वा कै.बाबा शिंगोटे यांना आदरांजली अर्पण केली.
दैनिक पुण्यनगरीचे संस्थापक कै.बाबा शिंगोटे यांना फलटण शहर व तालुक्यातील पत्रकारांच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी बेडकिहाळ बोलत होते. यावेळी पत्रकार यशवंत खलाटे – पाटील, नसीर शिकलगार, युवराज पवार, बाळासाहेब ननावरे, विनायक शिंदे, रोहित वाकडे, प्रदीप चव्हाण, शक्ती भोसले, संजय जामदार, विजय भिसे, संदीप कदम उपस्थित होते.
बेडकिहाळ यांनी भावनिक आदरांजली व्यक्त करताना कै.बाबा शिंगोटे यांना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने दिलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ संपादक पुरस्कार वितरणावेळच्या पोंभुर्ले (जि.सिंधुदुर्ग) येथील समारंभातील कै.बाबा यांच्या साधेपणाच्या भावूक आठवणी सांगून, वृत्तपत्राची नस नि नस माहित असणार्या कै.बाबांनी प्रचंड मोठ्या उद्योग समूहाच्या संस्थापक मालकाचा कधीही रुबाब मिरवला नाही, म्हणूनच खर्या अर्थाने ते पुण्यनगरी समूहातील सर्वांचे आदर्श बाबा झाले, असेही सांगितले.
यावेळी बोलताना यशवंत खलाटे – पाटील म्हणाले, पुण्यनगरी वृत्तपत्र समूहातील सर्वांना ‘बाबा’ गेल्याचे दु:ख आहे; परंतु त्यांची कामावरील निष्ठा व साधी राहणी आम्हा सर्वांना सदैव प्रेरणादायी राहणार आहे.
नसिर शिकलगार यांनी सर्वांना समान वागणूक देणारा आगळावेगळा संपादक मराठी वृत्तपत्रसृष्टीने गमावल्याची भावना व्यक्त करुन त्यांचे कार्य, त्यातील जिद्द नव्या पिढीतील पत्रकारांना नेहमीच मार्गदर्शक ठरेल असे सांगितले.
वृत्तपत्र व्यवसायात निरपेक्ष वृत्तीने पडेल ते काम निष्ठेने करण्याची प्रेरणा कै.बाबा शिंगोटे यांच्या जीवन कार्यातून मिळते. आपले वृत्तपत्र भांडवलदार, जाहिरातदारांचे न राहता सामान्य वाचकांचे व्हावे हा त्यांचा प्रयत्न आम्हा तरुण पत्रकारांना आदर्श असा असल्याचे, विनायक शिंदे यांनी सांगितले.