दैनिक स्थैर्य | दि. २० नोव्हेंबर २०२४ | फलटण | राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया संपूर्ण झाली आहे. यामध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील 14 उमेदवारांचे भवितव्य मतपेटी मध्ये बंद झाले अर्थात ईव्हीएम मध्ये लॉक झाले आहे. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये वाढलेला मतदानाचा टक्का कुणाला तारक ठरणार व कुणाला बाधक ठरणार याबाबत आता सर्वत्र चर्चा रंगू लागल्या आहेत.
सन 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ३ लाख ३१ हजार ६८५ मतदारांपैकी २ लाख १३ हजार ७९० मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले होते. त्यापैकी १ लाख १४ हजार १६५ पुरुष मतदार होते तर ९८ हजार ८२८ महिला मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले होते. सन २०१९ साली झालेल्या मतदानाचा टक्का हा ६४.४६% एवढा होता.
तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 3 लाख 39 हजार 662 मतदारांपैकी एकूण 2 लाख 41 हजार 329 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामध्ये एकूण पुरुष 1 लाख 26 हजार 229 मतदारांनी तर 1 लाख 15 हजार 092 महिला मतदारांनी तर इतर 8 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. 2024 साली होत असलेल्या या विधानसभा निवडणुकीत एकूण 71.05% मतदान संपन्न झाले आहे.
फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात प्रमुख लढत ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादी अशीच बघायला मिळत आहे. यामध्ये स्थानिक राजे गटाच्या विरुद्ध खासदार गट अशी लढत बघायला मिळाली होती. दोन्ही गटांनी आपली प्रचार मोहीम राबवताना अतिशय काटेकोर नियोजन केले होते; त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काटे की कट्टर बघायला मिळाली होती.
राज्यामध्ये असलेल्या महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना राबविली होती. त्याचा परिणाम संपूर्ण राज्यामध्ये बघायला मिळाला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागांमध्ये महिला मतदारांनी उस्फुर्तपणे मतदान केले असल्याचे बघायला मिळाले आहे. यामध्ये अगदी महिलांच्या लाबंच लांब रांगा लागल्या असल्याचे सुद्धा बघायला मिळाले आहे.
आज झालेल्या मतदानामध्ये मतदानाचा टक्का वाढल्यामुळे नक्की कोणत्या उमेदवाराला तारक ठरणार आहे तर कोणत्या उमेदवाराला मारक ठरणार आहे ? याचे चित्र शनिवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.