सहाय्यक नगर रचनाकार रोहित पाटील भ्रष्ट, मनमानी अधिकारी : सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे

तात्काळ बदली करण्याची मुख्याधिकार्‍यांकडे मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १७ नोव्हेंबर २०२३ | फलटण | फलटण नगर परिषदेतील सहाय्यक नगर रचनाकार रोहित पाटील हे विकास कामांच्या रेखांकनाबाबत किंवा बांधकाम परवानगीबाबत छाननी करताना अत्यंत बेजबाबदारपणे व मनमानी करून काम करतात. बांधकाम परवानगी देण्याच्या बदल्यात आर्थिक देवाण-घेवाण करणे यातच त्यांचे स्वारस्य असते. म्हणून अशा गलथान व भ्रष्ट कारभार करणार्‍या अधिकार्‍याची तात्काळ बदली करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांनी पत्राद्वारे नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांकडे केली आहे.

दरम्यान, सहाय्यक नगर रचनाकार रोहित पाटील हे दुसर्‍यांदा नगर परिषदेत रूजू झाले आहेत. ते मागे नगर परिषदेत नियुतीस होते. मात्र, गलथान काम केल्यामुळे त्यांची बदली झाली होती; परंतु राजकीय हस्तक्षेप करून त्यांनी पुन्हा आपली नियुती फलटण नगर परिषदेमध्ये करून घेतली आहे.

नंदकुमार मोरे यांनी मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, विकास कामांबाबत रेखांकनाबाबत किंवा बांधकाम परवानगीबाबत छाननी करताना कोणते आरक्षण कुठे आहे, विकास कामांसाठी ती जागा योग्य आहे का, याबाबत कोणतीही शहानिशा न करता त्यांना फत परवानगी देताना आर्थिक देवाण-घेवाण करण्यातच स्वारस्य असल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास येत आहे. एखाद्या व्यावसायिकाने किंवा सामान्य माणसाने नगर परिषदेकडे बांधकाम परवानगी मागितली तर ती दिली जाते; परंतु नंतर हेच अधिकारी त्या बांधकाम परवानगीतील कच्चे दुवे शोधून काही खंडणीखोर तथाकथित लोकांना याची माहिती पुरवतात व ते लोक नगर पालिकेत संबंधित बांधकामाबाबत अर्ज करून संबंधित बांधकाम व्यावसायिक व सामान्य माणसांना वेठीस धरतात. त्यांना खंडणीची मागणी करतात. हीच ‘मोडस ऑपरेंडी’ रोहित पाटील यांनी कित्येक गृहप्रकल्प व सामान्य माणसाच्या घरासंदर्भात अवलंबली आहे. यातूनच प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे. लोकांनी घरे बांधावीत की नाही, असा प्रश्न सामान्य लोकांना पडला आहे.

रोहित पाटील यांनी राजकीय हस्तक्षेप करून आपली नियुती पुन्हा फलटण नगर परिषदेमध्येच का केली, याचे उत्तर वरिष्ठ घेणार आहेत का? तसेच त्यांनी दिलेल्या परवानग्या याबाबत आर्थिक देवाण-घेवाण झाली आहे, याची चौकशी कोण करणार?

सहाय्यक नगर रचनाकार रोहित पाटील यांनी अनेक गृहप्रकल्प व बांधकाम परवानगी देण्याबाबत संबंधितांकडून मोठ्या प्रमाणात लक्ष्मी प्राप्त करून घेतलेली आहे. त्यांनी शहरातील काही ओपन स्पेससुध्दा काही बिल्डरांना मध्यस्थी करून बांधकाम करण्यासाठी दिल्या असल्याचे निदर्शनास आले आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करावी व त्यांची तात्काळ बदली करावी. तसा प्रस्ताव आपण आपल्या वरिष्ठ कार्यालयास द्यावा अन्यथा नगर परिषद मुख्यालयासमोर नाईलाजास्तव मला उपाषेणाचा मार्ग अवलंबावा लागेल, याची नोंद आपण व संबंधित विभागाने घ्यावी व रोहित पाटील यांची तात्काळ फलटण नगर परिषदेतून बदली करावी, अशी मागणी नंदकुमार मोरे यांनी केली आहे.

नंदकुमार मोरे यांनी वरील पत्र मुख्याधिकार्‍यांबरोबरच सातारा जिल्हाधिकारी, सहाय्यक संचालक, नगर रचना, सातारा व संचालक, नगर रचना, पुणे विभाग यांनाही पाठविले आहे.


Back to top button
Don`t copy text!